वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील नागपूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेडगाव चौरस्त्या जवळील हरियाणा मेवात धाब्याजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वर वधूसह तीन जण गंभीर जखमी झाले असून चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात एवढा भीषण होता की, नवरदेवाच्या वाहनाची मागील बाजू चक्काचूर झाली आहे. तर टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रकचे देखील समोरील बाजूने नुकसान झाले आहे..
गाडीचे चाक बदलताना टोमॅटोच्या ट्रकने दिली जबर धडक :
23 मे सोमवारी पहाटेच्या सुमारास नागपूरकडून जामकडे येत असलेली कार ही नवरदेवाची असून त्यात नवदाम्पत्यासह इतर नातेवाईक लग्न आटोपून घरी जात होते. काजल ओचवार, आकाश ओचवार, विजय ओचवार, अश्विनी सांगडेवार आणि अन्य हे पाच जण विवाह समारंभ आटोपून नागपूरहून वणीकडे जात होते. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्त्या जवळील हरियाणा मेवा धाब्याजवळ त्यांची कार पंक्चर झाल्याने चालक चाक बदलत असताना याच मार्गाने जामकडे टोमॅटो भरुन येत असलेला आयशर हा नवरदेवाच्या फुलांनी सजलेल्या कारवर येऊन जोरदार धडकला. तर त्याच्या मागून येत असलेला टिप्पर आयशरवर येऊन धडकला आणि कारला देखील धडक दिली.
या अपघातात वधू काजल ओचवार, वर विजय ओचवार, अश्विनी सांगडेवार सर्व राहणार वणी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी नागपूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे काजल व आकाश ओचवार यांचा विवाह रात्री झाला होता आणि विवाह समारंभ आटोपून नवरी नवरदेव आपल्या गावाला परत जात असताना हा विचित्र अपघात झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस समुद्रपूर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम, पोलिस कर्मचारी सागर पाचोडे, इस्माईल शाह यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आयशर चालक वाहन पसार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.