Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज परिसरात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, पोलिसांची खबरी असल्याच्या संशयावरून महिलेवर अत्याचार (Rape) करण्यात आला. गुन्हेगारांची माहिती पोलिसांना का देते म्हणत आठ जणांनी या 40 वर्षीय महिलेला आधी मारहाण केली. त्यानंतर नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी (19 मे) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वाळूज भागात घडली असून, या प्रकरणी आता वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अधिक माहितीनुसार, पीडित महिला आपल्या कुटुंबासह वाळूज परिसरात वास्तव्यास आहे. तर वाळूजच्या लक्ष्मी गायरानात शेती कसून उपजीविका करते. मात्र महिलेच्या मोठ्या मुलास दारूचे व्यसन असल्याने तो सतत आईला शिवीगाळ करीत होता. मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिला आठवडाभरापूर्वी घर सोडून शेतात राहण्यास गेली. दरम्यान, शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जेवण केल्यानंतर पीडित महिला घरात बसलेल्या असताना त्यांच्या ओळखीचे संदीप पवार, शिवा गवळी, पोपट नारायण पवार, धानेश नारायण पवार, तोजश अक्षय काळे, जिजाबाई धानेश पवार, अश्विनी पोपट पवार आणि गंधुका सुदर्शन पवार हे महिलेच्या घरात शिरले. 


नराधमाने पाशवी अत्याचार केला...


यानंतर सर्वांनी महिलेसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोपट पवार याने तिला, "मुंबईवरून चोऱ्या करून आलेल्या आरोपींची माहिती पोलिसांना का देते." या कारणावरून तिला शिवीगाळ सुरू केली. यावेळी महिलेने मी पोलिसांची खबरी नाही, असे सांगत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या पोपट पवार व त्याच्या सहकाऱ्यांनी महिलेला खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता धानेश पवार याने, तू जर आवाज केला तर तुझ्या मेव्हणाप्रमाणे तुलाही कापून टाकीन अशी धमकी दिली. यानंतर सर्वांनी तिला बेदम मारहाण केली. तर यावेळी सोल्जर पवार या नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या अत्याचारानंतर पोपट पवार याने आपल्या सहकाऱ्यांना आपले काम झाले आता येथून चला, असे म्हणून सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले.


महिलेची पोलिसांत धाव...


या घटनेने महिलेला मोठा धक्का बसला. तर अत्याचाराच्या घटनेनंतर घाबरलेल्या पिडीत महिलेने वाळूज पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तर महिलेच्या फिर्यादीनुसार मारहाण आणि अत्याचार प्रकरणी आठ जणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार या करीत आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या : 


संभाजीनगर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या, घटनास्थळी पोलीस दाखल