भिवंडी : फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात मात्र वेगवेगळ्या तरुणांशी गरिबीच्या नावाने लग्न करून त्यांच्याकडून पैसे व दागिने घेऊन नवविवाहित वराची फसवणूक झाल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी भामट्या तारुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
रिना देवरे वय 23 वर्ष असे गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आई मंगला देवरे व मावशी सुनीता संजय माहिरे यांच्या मदतीने घरची परिस्थिती खूप गरीब आहे अशी खोटी माहिती सांगून रिना हिचे लग्न लावत असत. मात्र लग्न झाल्यानंतर रीना आपल्या पतीला वेगवेगळी खोटी कारणे सांगून पळून जायची जातांना लग्नात नवरदेवाने दिलेले पैसे व दागिने घेऊन पळून जायची. वेगवेगळ्या ठिकाणचा खोटा पत्ता त्या प्रत्येकवेळी नवनवीन नवऱ्यांना देत असल्याने तिचा पत्ता देखील कोणाला सापडत नव्हता.
भिवंडीत 30 मार्च रोजी भादवड येथील हरिश उत्तम पाटील याच्याशी तिचा चौथा विवाह झाला होता. याआधी रिना हिने सुरत , मालेगाव , पुणे येथील तरुणांना लग्न करून फसवले होते, तर तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणाशी ठरला होता. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी रीना लग्न करतांना गरिबीचे कारण पुढे करून नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन लग्न करत असे, भिवंडी येथील हरिष पाटीलसाठी मुलगी दाखवण्यात आली व लग्नाची तारीख ही ठरली. लग्नाआधी मुलीच्या नातेवाईक यांना आधी 5 हजार व त्यानंतर 40 हजार व हळदीच्या दिवशी आई खूप आजारी आहे असे सांगून 50 हजार रुपये घेतले . अखेर 30 मार्च रोजी वधू रिना देवरे हिचे लग्न भिवंडीतील हरिश याच्याशी झाले व लग्नानंतर हरीश आपल्या पत्नीला घेऊन भिवंडी येथील भादवड या ठिकाणी आला. त्यावेळी रिना हिने आपले दागिने घरी विसरून आल्याचे सांगितले तसेच रिना हिला 95 हजार रुपये दिले व लग्नात तिला सोन्याचे दागिने देखील केले होते. असे एकूण दागिने व रोख रकमेसह एक लाख 20 हजार दिले होते
मात्र त्यांनतर रिना व तिच्या आईने तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणासोबत जमविला होता या तरुणाकडून रिनाने 60 हजार रुपये घेतले होते. त्याच्याशी विवाह करायचा असल्याने रीना हिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता त्यासाठी पतीला आईची तब्बेत बरी नसल्याचा कारण सांगितले. मात्र पतीने मी देखील सोबत येतो असे सांगितल्यानंतर रीना हिने त्यास नकार दिला व विनाकारण भांडण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिला घेण्यासाठी मंगला व सुनिता या दोघी भिवंडीत आल्या परंतु संशय आल्याने हरीश यांनी या सर्वांना घरात बंद केले. पत्नीच्या वागण्याचा पती हरिश यांस संशय आल्याने त्याने थेट शांतीनगर पोलीस ठाणे गाठले व सर्व हकीकत सांगितली पोलिसांनी या तिघांना आपल्या ताब्यात घेत चौकशी केली असता असे निदर्शनात आले की रीना हिच्यासाठी स्थळ शोधण्याचा काम खुद्द त्याची आई व मावशी करत होते व वर पक्षाला आई वडील आजारी आहे असे खोटे सांगून सहानुभूती मिळवत होते .
आपली फसवणूक झाल्याचे समजताच हरीश पाटील यांनी शांती नगर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली व शांतीनगर पोलिसांनी रिना देवरे , तिची आई मंगला देवरे व मावशी सुनीता माहिरे यांना ताब्यात घेतले असता फसवणुकीचा सर्व प्रकार समोर आला. या फसवणूक प्रकरणी या तिघी महिलांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघींना देखील अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलांनी आणखी किती जणांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत तसेच अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.