Maharashtra Assembly Clash : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारातच एकमेकांसोबतच भिडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी सर्जेराव बबन टकले (37) आणि नितीन हिंदुराव देशमुख (41) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आज विधानभवनातील मारहाणप्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आझाद मैदान येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. या दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची मागणी कोर्टात केली होती. पोलिसांनी आरोपींना सीसीटिव्ही दाखवले तर इतर आरोपींची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. मात्र, आरोपी सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. 

आरोपींची सहकारी पोलिसांच्या रडारवर

तर नितीन देशमुखांच्या वकिलांनी नितीनकडे अधिकृत पास असल्याचे दाखवले आहे. सीसीटिव्हीत फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दाखवले आहे. 14 ते 15 हून अधिक लोकं घटनास्थळी होते, असे देखील वकिलांनी म्हटले आहे. तसेच विधानभवन राडा प्रकरणात आणखी दोन ते तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. नितीन देशमुखचा एक सहकारी, ऋषिकेश टकले सोबत असणारे त्याचे दोन सहकारी सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. अटकेत असलेल्या दोन आरोपींकडे या संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते. मात्र, चौकशीत आरोपी सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसानी कोर्टात केलेला आहे.

आरोपींच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज

नितीन देशमुखला विधानभवनात येण्यासाठी आवश्यक असणारा पास कसा उपलब्ध झाला? याबरोबरच ऋषिकेश टकले विनापास कसा आतमध्ये आला? याची देखील चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. दोन्ही आरोपींना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आता या आरोपींना जेल मिळणार की बेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

पडळकर-आव्हाडांकडून सभागृहात खेद व्यक्त

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील वादावर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला केली होती. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करावा, अशा सूचना विधानसभेत दिल्या होत्या. आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित सर्जेराव बबन टकले आणि नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर फौजदारी करण्यात येत असल्याचे देखील नार्वेकर यांनी सांगितले होते. तर विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात खेद बाळगत करत दिलगिरी व्यक्त केली होती. 

आणखी वाचा 

Ajit Pawar and Suraj Chavan: अजितदादांनी तातडीने भेटायला बोलावलं, मारकुटा सूरज चव्हाण बोट फ्रॅक्चर झाल्याचं सांगून लातूरमध्येच थांबला, मग अजितदादांनी ट्विटरवरुनच 'कार्यक्रम' केला