नागपूरः एअरहोस्टेसचे प्रशिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय तरुणीसोबत सुमारे दीड वर्ष संबंधात राहिल्यानंतर तिने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिचे (Airhostess) खासगी व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या संदर्भात पीडितेच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी (kapil nagar) विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अल्पेश राजपाल शेडे (वय 22) रा. पंचशीलनगर असे आरोपीचे नाव आहे.


आरोपीला पोलिसांनी अटक केली असून 354 (ड) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही 17 वर्षांची आहे. बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर ती एअरहोस्टेसचे प्रशिक्षण घेत आहे. पीडिता व अल्पेशची गेल्या दीड वर्षापासून ओळख आहे. एका टूरमध्ये दोघे भेटले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले. सतत संपर्कात राहिल्याने त्यांच्यात प्रेम फुलले. प्रेमाचा आणाभाका घेत दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. अल्पेश हा तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. मात्र, तो कोणताही काम धंदा व शिक्षण घेतले नसल्याने प्रेयसी त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हती.


दरम्यान त्याने लग्नासाठी तगादा लावला. ती लग्नास तयार होत नसल्याचे बघून त्याने दोघांचे सोबत असलेले खासगी फोटो व व्हिडीओ (Private photo and videos) सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी पीडित तरुणीने संतापून पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.


खुद्द फिर्यादीच निघाला आरोपी


नागपूरः दुसऱ्या एका घटनेट सावनेर-काटोल (Savner - katol) मार्गावरील सावंगी शिवारातील विटाभट्टीजवळ शुक्रवारी दुपारी लुटमार झाल्याची घटना घडल्याचा बनाव, तेलगाव येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने केला. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा तपासत घेतला असता व प्रकरणात फिर्यादी स्वतःच आरोपी असल्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांनी या प्रकरणातील फिर्यादीला अटक केली. त्याने ज्या व्यक्तीकडे रक्कम ठेवली होती त्या व्यक्तीकडून पोलिसांनी 4 लाख 80 हजार रुपये जप्त केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.


फिर्यादीने त्याला लुटण्याचा स्वतःच बनाव का केला याबाबत चौकशी दरम्यान ही बाब पुढे येईल. बाबासाहेब गोविंदराव ठाकरे (तेलगाव, ता. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वेकोलीतून सेवानिवृत्त झालेल्या बाबा ठाकरे याने शुक्रवारी दुपारी सावनेर शहरातील बँकेतून पाच लाख रुपयांची उचक केली आणि दुचाकीने गावाला जायला निघाला. वाटेत सावंगी शिवारात दोन दुचाकीने आलेल्या चौघांनी अडवले आणि आपल्यावर चाकूसारखे शस्त्र रोखून डिक्कीतील पाच लाख रुपये हिसकावून घेतले. अशी तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात नोंदविली होती.