लातूर : शहरात खळबळजनक घटना घडली असून विक्रम पांचाळ (वय 21) या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना औसा रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हॉस्टेलमधील वादामुळे तरुणांच्या दोन गटात वाद झाला आणि त्यातून या तरुणाची हत्या झाल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

लातूरमधील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान विक्रम पांचाळ याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

विक्रम पांचाळ हा लातूरमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास असून तो हॉस्टेलवर राहत होता. तो लातूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी तरुण घटना घडताच फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे औसा रोड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लातूर पोलीस हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत असून पुढील तपास सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

ही बातमी वाचा: