Kurla BEST Bus Accident : मुंबई: कुर्ला बेस्ट अपघात (Kurla BEST Bus Accident) प्रकरणात 7 जणांच्या मृत्यूचे कारण ठरलेला बेस्ट चालक संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर (LBS Road Mumbai) लोकांच्या गर्दीत भरधाव बस शिरुन हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत अनेकजण चिरडले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 48 जण जखमी झाल्याची माहिती आहे. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला, असे कारण प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, काहीजण या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दलही संशय व्यक्त करत आहेत. संजय मोरे याने मद्यपान केले होते का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. पोलिसांनी काल रात्रीच संजय मोरे याला ताब्यात घेतले होते. आता त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र, कालच्या घटनेनंतर संजय मोरे नेमका कोण, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संजय मोरेचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असल्फा परिसरात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. संजय मोरे यांच्या कुटुंबीयांनी तो दारु पीत नसल्याचे सांगितले आहे. मोरे यांना काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती. त्यासाठी मोरे यांनी 10 दिवस ट्रेनिंग घेतले होते. संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोरे यांच्या कुटुंबीयांनी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास नकार दिला आहे.


कुर्ल्यात मृत्यूतांडव, 7 जणांचा नाहक बळी


काल रात्री भरधाव बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडलाय.