Satish Bhosale Khokya: बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे प्रकरण गाजत असताना सतीश उर्फ खोक्या भोसलेचे (Satish Bhosale Khokya) कारनामे ही प्रचंड गाजले होते. मात्र, आता त्याच खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांनी पोलीस आणि झापेवाडीच्या काही ग्रामस्थांवर गंभीर आरोप केले आहे. नागपुरात खोक्याचे कुटुंबीय अनुसूचित जाती व जमाती आयोगासमोर सुनावणीसाठी उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी काही गंभीर आरोप केले. यामध्ये पोलिसांनी आमच्या विनयभंग व मारहाणीच्या तक्रारीवर आजवर कुठलीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोपही खोक्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबीयांनी कोण कोणते आरोप केले?

1) वन विभागाने पक्षपात करून आमचे घर पाडले. नंतर दुसऱ्या दिवशी गावगुंडानी आमच्या घराचं साहित्य जाळून टाकलं. यावेळी आमचे पाळीव प्राणीही जाळून टाकण्यात आले.

2) पारधी वस्तीतील नागरिकांनी गावातील काही लोकांच्या शेतातील डुकरांचा शिकार करून मारण्यास नकार दिला, त्यामुळे वाद झाला. गावातील त्या दबंग लोकांनी बळजबरीने काही पारध्याना शेतात नेले. दुसऱ्या दिवशी डुकरांच्या शिकारीसाठी बळजबरीने लावलेले जाळे काढताना एका अल्पवयीन मुलीची छेडखानी करण्यात आली. लहान मुलांना मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे तो वाद आणखी वाढलं. 

3) त्या मारहाणीत जखमी झालेल्या काही गावकऱ्यांना खुद्द सतीश भोसलेने आपल्या गाडीत रुग्णालयात नेऊन उपचार केले होते.

4) अल्पवयीन मुलीने पोलीस स्टेशन गाठून छेडखानीची तक्रार दिली. तेव्हा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये काही गावकऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळे गावकऱ्यांचा रोष सतीश भोसले आणि त्याच्या कुटुंबीयांवर वाढला.

5) पारधी समाजासह मागासवर्गीयांची एकूण 13 घरे त्या ठिकाणी जाळण्यात आली.

6) पोलिसांनी आमच्या विनयभंग व  मारहाणीच्या तक्रारीवर आजवर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही.

7) अनुसूचित जाती जमाती आयोगाने काही आठवड्यांपूर्वी जेव्हा झापेवाडी गावात पाहणी केली होती. तेव्हा आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आयोगाच्या निर्देशांचेही पालन पोलिसांकडून करण्यात आले नाही, म्हणून आमची तक्रार आज पुन्हा आयोगासमोर मांडली आहे.

आमचे घर लवकरात लवकर बांधून देण्यात यावं; खोक्याच्या कुटुंबीयांची मागणी-

आता पावसाळा सुरू झाला असून आम्ही त्याच ठिकाणी मोठ्या अडचणीत राहत आहोत. आमचे घर लवकरात लवकर बांधून देण्यात यावं अशी मागणी खोक्या भोसलेच्या वृद्ध वडिलांनी केली आहे.

संबंधित बातमी:

Satish Bhosale : खोक्याचं डोकं बर्फाच्या थंडगार पाण्यात बुडवलं; काही जणांची नावं घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून बळजबरी; वकिलाचा खळबळजनक आरोप