Crime : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणं पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाला चांगलेच अंगलट आले आहे. महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी या कर्मचाऱ्यांची चौकशी करत संबंधित विभागास कारवाई करण्यास सांगितले . ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही अधिकारी बचावात्मक पवित्रा घेत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.
धर्मेंद्र सोनवणे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांचा केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान आयुक्त जाखड यांच्या गाडीचा धर्मेंद्र सोनवणे हा कंत्राई चालक दुचाकीने पाठलाग करत होता. ही बाब लक्षात येताच आयुक्तांनी त्याच्या गळ्यात असलेले आय कार्ड पाहिले. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करत सोनवणे यांची चौकशी केली. संबंधित विभागाला सोनवणे याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करत योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. यादरम्यान आयुक्त कोणत्या परिसरात जात आहेत हे पाहण्यासाठी धर्मेंद्र सोनवणे आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करत होता. याबाबत सोनवणे कुणाला तरी माहिती देत असल्याचे बोलले जात आहे. सोनवणे कुणाला काय माहिती देत होता हे चौकशी नंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे भूमाफियांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. आयुक्त यांच्या दौऱ्याआधीच सगळं सुस्थितीत असल्याचे दाखवून द्यायचे असल्याने आयुक्तांच्या दौऱ्याची माहिती काढण्यासाठी हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सदर चालक का बड्या अधिकाऱ्यांची वसुली करत असल्याची माहिती समोर आली आहे.
कारणे दाखवा नोटीस -
सोनवणे या कर्मचाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशादरम्यान सोनवणे याला कारणे दाखवा नोटीस सामान्य प्रशासन विभागाने धाडली असून त्याच्यावरती कारवाई का करू नये ? याबाबत त्याच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. हा कर्मचारी नेमकं कशासाठी आयुक्तांचा पाठलाग करत होता याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हप्ता वसुली -
आयुक्तांचा पाठलाग करत असल्याची बातमी शहरभर पसरल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. सोनवणे हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हप्ता वसूल करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या चौकशी बरोबरच अधिकाऱ्यांची चौकशी होते की काय याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे अधिकारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनवणे हा फेरीवाल्यांकडून अवैध्यरीत्या हप्ते वसुली करतो, आणि तेच हप्ते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आलेय. त्यामुळे अधिकारी तूर्तास घाबरलेले दिसून येत आहेत. अधिकाऱ्यांकडे विचारण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. मात्र एवढी गंभीर घटना समोर आल्याने आता आयुक्त काय कारवाई करतात? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.