कल्याण : घराच्या दिशेने शिकवणीहून निघालेल्या नऊ वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याच्या नातेवाईकांना 40 लाखाची खंडणी देण्यासाठी धमकावण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. याप्रकरणी आंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अंबरनाथ पोलिसांसह कल्याण, ठाणे, उल्हासनगर क्राइम ब्रांचने समांतर तपास सुरू केला. अखेर पोलिसांनी तीन दिवसात सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे 9 वर्षाच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे. तर त्याचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अमजद खान, छोटू सिंग ,योगेंद्र सिंग आणि सुनील लाड अशी या आरोपीची नावे आहेत.
अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरातील ग्रीन सिटी संकुलात सोनू सबिता हे आपल्या कुटुंबासह राहतात. सोनू सबिता यांचा वडापावचा व्यवसाय आहे. 8 सप्टेंबर रोजी त्यांचा 9 वर्षाचा मुलगा कृष्णा नेहमीप्रमाणे सायंकाळी 7 वाजता शिकवणीहून घरी जाण्यासाठी निघाला मात्र तो घरी पोहचला नाही. बराच वेळ उलटूनही कृष्णा घरी न पोहचल्याने सोनू यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संवेदनशील घटना असल्यामुळे पोलिसांनी रात्रभर त्यांच्या ओळखीचे आणि नातेवाईकांकडे मुलाचा शोध घेतल्यानंतर अखेर गुरुवारी अंबरनाथ पोलिसांसह ठाणे गुन्हे शाखेने ,कल्याण गुन्हे शाखा आणि उल्हासनगर गुन्हे शाखा यांच्या बरोबर समांतर तपास सुरु केला. याच दरम्यान गुरुवारी संध्याकाळी मुलाच्या काकाला 40 लाख रुपयाची खंडणी न दिल्यास मुलाबरोबर त्याच्या वडिलांना मारण्याची धमकी देण्यात आली. मात्र परत अपहरणकर्त्यांनी फोन न केल्याने गुंता वाढला होता. मात्र पोलिसांनी पाच टीम सक्रिय करतानाच त्यांना वडिलांच्या दुकानाशेजारी असलेल्या सीसीटीव्हीत आणि त्याच्या घराबाहेर मुलासोबत मैत्री करणारे काही संशयित चेहरे दिसले. तर मुलगा हरविल्यानंतरही अमजद खान हा आरोपी मुलाबरोबर असल्याचे दिसल्याने पोलिसांनी अमजद खानचा शोध सुरु केला. हे तिन्ही आरोपी ज्या मिठाईच्या दुकानात काम करत होते त्या दुकानातून त्यांचा मोहने परिसरातील पत्ता मिळवून आज दुपारी पोलिसांनी अमजद खानच्या राहत्या घरी धाड टाकली असता अमजदसह हा चिमुरडा त्याच्या घरात सापडून आला.
पोलिसांनी अमजदला पकडल्याचे कळताच त्याचे इतर दोन साथीदार चार चाकीने इगतपुरीच्या दिशेने पळाले. त्यांनी आधीच उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसचे तिकीट बुक केले होते. मात्र पोलिसांनी नाकाबंदी करत या दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले तर फोन वरून धमकावणाऱ्या चौथ्या आरोपीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकत या मुलाला त्याच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्द केले. अवघ्या चार दिवसात आपल्या मुलाची सुखरूप सुटका केल्याने सोनू यांनी पोलिसांचे आभार मानले.