कल्याण : सराईत गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी आधी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर ज्या भागात या गुंडांची दहशत होती ती संपवण्यासाठी पोलिसांनी या गुंडांना त्याच भागातून बेड्या घालून त्यांना फिरवलं. स्थानिकांमध्ये पोलिसांच्या या कारवाईचे खूप कौतुक होत आहे. कल्याणमध्ये गुंडांमध्ये पोलिसांची एकच दशहत पाहायला मिळत आहे.
कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसात स्थानिक गाव गुंडांनी खूपच दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. सर्व सामान्यांमध्ये दहशत करण्यासाठी मध्यरात्री दारु पिऊन धिंगाणा घालणे, वाहनांची तोडफोड करणे, मारहाण करणे यांसारखे प्रकार सुरु केले होते. सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी या कल्याण डोंबिवलीत गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाई सुरु केली. पोलिसांनी आधी एमपीडीए अंतर्गत कारवाई करत अनेक गुंडांना तुरुंगात पाठवले. त्यापेक्षा जास्त सराईत असलेल्या 12 गुंडांच्या विरोधात मोक्का लावण्यात आला.
कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या आदेशानंतर कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, क्राईम पीआय सुनील गवळी, हरिदास बोचरे, मंजुनाथ डोके, अंकुश श्रीवास्तव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात मोक्का लावण्यात आलेल्या काही आरोपांना बेड्या घालून गल्लीगल्लीत फिरवले. हातात बेड्या, माना खाली आणि मागे पोलीस होते. ज्या भागात या भाई लोकांची दहशत होती त्या भागात त्यांना फिरवून पोलिसांनी त्यांची चांगलीच जिरवली. स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.
लातूरमध्ये गुंडाची पोलीस स्टेशनपर्यंत वरात
असाच प्रकार काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये घडला होता. स्वतःला डॉन म्हणवून घेण्यासाठी गौस मुस्तफा सय्यद हा गुंड लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील मोहल्ल्यामधे काही दिवसांपासून दहशत निर्माण करत होता. गरीब, असहाय नागरिकांवर दाबाव टाकायचा. त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात 18 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रडारवर तो होताच. त्यात भर पडली ती अल्पवयीन मुलीच्या तक्रारीची. मग गुंडाला पोलिसी खाक्या दाखवत त्याची पोलीस स्टेशनपर्यंत वरात काढली. हा गुंड ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची ही अवस्था पोलिसांनी केल्यामुळे सर्वसामान्य लोक सुखावले होते. महिला पोलिसाच्या या फटक्यांमुळे इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.