कल्याण : इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टील हायटेक पद्धतीने चोरी करून बांधकाम व्यावसायिक आणि स्टील व्यापाऱ्यांची  फसवणूक करणाऱ्या टोळीचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  विशेष म्हणजे आपली चोरी लपवण्यासाठी स्टीलचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या वजनकाट्यात इलेक्ट्रॉनिक चिप लावून रिमोटद्वारे मालाचे वजन वाढविण्याचे काम हे चोर करत होते. मात्र पोलिसांनी या टोळीतील सात आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून 2.08 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आता इलेक्ट्रॉनिक चिप बनवणाऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.


कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात इमारत, गृहसंकुलाची कामे सुरू आहेत. या बांधकामासाठी लागणारे स्टील रायगड, जालना आणि अमरावती परिसरातून येते. मानपाडा पोलीस ठाण्यात स्टील चोरी करत फसवणूक केल्याच्या गुन्हा काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला एकदम साध्या वाटणाऱ्या या गुन्ह्यांची पाळेमूळे खोलवर रुजल्याचे तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सखोल तपास करत या प्रकरणी सात जणांना अटक केली. नितीन  चौरे, दिदारसिंग मंगलसिंग राजू, दिलबागसिंग, हरबन्ससिंग गिल, फिरोज मेहबुब शेख, शिवकुमार उर्फ मिता गिलई चौधरी, हरविंदरसिंग मोहनसिंग, हरजिंदरसिंग बलबीरसिंग राजपूत अशी आरोपींची नावे आहेत. 


अटक करण्यात आलेले आरोपी हे ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक आणि मालक यांना हाताशी धरुन कंपनीतून स्टीलचा माल निघल्यानंतर त्यातील काही माल भंगार व्यवसायिकाना विकायचे. उर्वरित माल हा बांधकाम व्यवसायिकांना देत त्यांची फसवणूक करत होते. विशेष म्हणजे स्टील खरेदी करणाऱ्या विकासक आणि इतर कंपन्यांना फसवण्यासाठी या टोळीने हायटेक पद्धत अवलंबली होती. स्टील मोजमाप करण्याच्या वजनकाट्याला रिमोटने ऑपरेट होणारी इलेक्ट्रिक चिप बसवून मालाचे वजन वाढत ही फसवणूक केली जात होती. पोलिसांनी या आरोपींकडून मालवाहू ट्रक, स्टील, इलेक्ट्रॉनिक चीप, रिमोट, मोबाईल फोन असा एकंदरीत 2 कोटी 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चीप बनवणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्यात सामिल इलेक्ट्रॉनिक चीप लावणारा आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर आरोपी यांनी आणखी कुठे अशा प्रकारे चीप लावलेल्या आहेत याचा तपास देखील पोलीस करत आहेत. अटक आरोपी फिरोज मेहबूब शेख याचेवर भंगार चोरीचे यापुर्वी सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी जालना येथील भंगार व्यवसायिक याचेंकडे माल विक्री केल्याची कबुली दिलेली आहे.


कशी करायचे फसवणूक?
आरोपी हे बांधकाम व्यवसायिकांकडे स्टीलचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या वजनकाट्यास इलेक्ट्रॉनिक चीप लावून, रिमोटद्वारे आलेल्या मालाचे वजन वाढवत होते. स्टील कंपनीकडून बांधकाम व्यवसायिकांकडे आलेले स्टील हे ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक आणि मालक यांना हाताशी धरुन कंपनीतून स्टीलचा माल निघल्यानंतर त्यातील काही माल भंगार व्यवसायिकांना विकून, उर्वरीत माल हा बांधकाम व्यवसायिकांच्या वजनकाट्यावर आणल्यावर रिमोट कंट्रोलद्वारे मालाचे वजन वाढवायचे. कमी प्रमाणात माल बांधकाम व्यवसायिकांना पुरवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घ्यायचे.