kalyan dombivli Latest Crime News: एकाच घरात दोनवेळा चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बायकोचं बाळंतपण आणि बहिणीच्या आजारपणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळे रिक्षाचालकाला चोरी करावी लागल्याचं समोर आलेय. बाजारपेठ पोलिसांनी एकाच घरात दोनवेळा चोरी करणाऱ्या अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.  


आधी ज्या घरात चोरी केली त्याच घरात चार महिन्यांनी पुन्हा चोरी केली. चोराने तब्बल 17 लाख रुपयांवर डल्ला मारला होता. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एकाच घरात दोनदा चोरी झाल्याने पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला, अवघ्या काही तासात या चोरट्याला बेड्या ठोकल्या. रियाज शेख असे या चोरट्याचं नाव आहे. रियाज हा त्या घरासमोरच राहत होता. त्याच्याकडून एकूण 3 गुन्ह्यांची उकल झाली असून 2 लाख 6 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पत्नीचे बाळंतपण व बहिणीच्या आजारपणात लाखो रुपये खर्च झाल्याने आर्थिक चणचणीतून त्याने चोरीचा मार्ग पत्करल्याचे पोलीस तपासात समोर आलेय. 


कल्याण पश्चिमेत मेमन मस्जिद परिसरात गुलजार टांगेवाली चाळ परिसरात फारुख शेख राहतात. त्यांचे कल्याणमध्येच शोरुम असून त्यांच्या घरासमोरच आरोपी रियाज शेख हा राहण्यास होता. तो रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. रियाज याची पत्नी ही गरोदर असताना व बहिण आजारी असताना त्यांच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च आला होता. त्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासू लागली. त्यातून रियाजने चोरीचा मार्ग पत्करला. ऑगस्ट महिन्यात फारुख यांच्या घराचे कुलूप तोडत रियाजने घरातील 8 तोळे सोने व रोकड चोरली होती. त्यानंतर 20 डिसेंबरला पहाटे फारुख हे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने घराबाहेर गेले होते. याचा फायदा घरातील 17 लाखाची रोकड चोरली. 


याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच घरात दोनदा चोरी झाल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेंद्र पाटील व गुन्हे पोलीस निरिक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक ए.जी.घोलप यांच्या पथकाने तपासास सुरुवात केली. शेजारीच राहणाऱ्या व्यक्तींचे हे काम असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यानुसार माहिती काढली असता गुप्त बातमीदाराने एक व्यक्ती फारुख यांच्या घरी गेल्याचे सांगितले. त्यानुसार तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी रियाजला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपण रिक्षाचालवत असून त्यावेळी त्या परिसरात नसल्याचे सांगितले. परंतू पोलिसांनी पोलिस खाक्या दाखवताच रियाज ने चोरीची कबुली दिली. यासोबतच त्याने बारदान गल्ली परिसरात देखील चोरी केल्याची कबुली दिली. येथून त्याने 1 तोळे सोने व 40 हजाराची रोख रक्कम चोरली होती.पोलिसांनी आरोपी रियाजयाच्याकडून 5 हजाराची रोख रक्कम व 9 तोळे सोने असा एकूण 2 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. रियाज हा सध्या पोलिस कोठडीत असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.