जालना : जिल्ह्यातील शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांच्या हत्या प्रकरणाचा उलघडा करण्यात जालना पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी सख्खा भाऊ आणि त्याच्या एका मुलाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मृत रमेश शेळके यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके आणि त्याची पत्नी दोन मुलांसह इतर एकूण 9 जणांविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अर्जुन दंडाईत नावाच्या आरोपीने कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


सदर आरोपीला मृताच्या भावाने सुपारी दिल्याचा देखील संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृत रमेश शेळके यांचे आरोपी असलेला मोठा भाऊ रामप्रसाद शेळके याच्या विरोधात वडिलोपार्जित जमिनीचा वाद होता. हे प्रकरण 2018 पासून न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना दोन्ही भावांमध्ये खटके उडत होते. त्यामुळे पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि संशयावरून आरोपी ताब्यात घेतले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सध्या 9 पैकी 5 आरोपी पोलिसांच्या अटकेत असून इतर 4 आरोपी अजून फरार आहेत. दरम्यान मृत रमेश शेळके आणि त्याच्या मुलाला आज पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


प्रकरण असे आले उघडकीस?
मृत शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांचे त्यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके यांच्या बरोबर वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीचा वाद होता, सदर प्रकरणात मृत रमेश शेळके यांनी कोर्टात दिवाणी दावा दाखल केला होता. याच जमिनीच्या वादातून एकमेकाविरोधात अनेकवेळा पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारी झाल्या होत्या. हाच धागा आणि मृत रमेश शेळके यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी राम प्रसाद शेळके, त्याची पत्नी आणि दोन मुलांसह 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात शेवटचा कॉल डिटेल्स काढून शेजारी गाव असलेल्या ब्राम्हण खेडा येथील आरोपी अर्जुन दंडाईत याला ताब्यात घेतलं, त्याची उडवा उडवा उडवीची उत्तरे ऐकून पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व प्रकरण पोलिसांसमोर सांगितले आणि हत्या आपणच केल्याचं कबूल केलं.

सुपारीचा संशय
मृत रमेश शेळके आणि त्यांच्या खुनात आरोपी असलेला मोठा भाऊ रामप्रसाद शेळके यांच्यात मध्यस्थ असलेला आणि हत्येची कबुली दिल्याचा आरोपी अर्जुन दंडाईत यांचे संबंध पाहता दोघांमध्ये रमेश शेळके यांना ठार मारण्याबाबत संगनमत झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. यात आरोपी रामप्रसाद शेळके यानेच या अर्जुन दंडाईतला सुपारी दिल्याचा अंदाज प्राथमिक तपासात समोर येतोय.
कसा झाला खून?
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रमेश शेळके यांना 4 वाजता आरोपी अर्जुन दंडाईत याने मृत रमेश शेळके यांना एका ग्रामपंचायत सदस्याला आपल्याला घेऊन जायचे आहे. ज्यात आपल्याला पैसे मिळतील म्हणून फोन केला होता. दरम्यान यासाठी मृत रमेश शेळके यांनी टाळाटाळ केली. मात्र, ते आरोपीला भेटण्यास तयार झाले. दोघेजण मेहकर (जि. बुलढाणा) येथे गेले. रात्री येताना एका रस्त्यात ढाब्यावर त्यांनी जेवण केलं. त्यानंतर आरोपीने दारू पिली आणि मृत रमेश शेळके यांच्या गावाकडे जात असताना गाडीत, डोक्यात दगड घालून गळा आवळला. दरम्यान रमेश शेळके यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर त्याने पाथरूड नागापूर रोडवर मृत रमेश शेळके यांच्या गावापासून 6 किलोमीटर अंतरावर एका घाटात मृतदेह ड्रायव्हरच्या सीटवर बसवून मृताचे ओळखपत्र ओळख पटण्यासाठी बाहेर काढून जवळ असलेले डिझेल गाडीवर तसेच मृतदेहावर टाकले, यानंतर गाडी पेटवून ती दरी मध्ये लोटून दिली. दरम्यान आरोपीने दिलेल्या या माहितीवर पोलिसांची संपूर्ण खात्री नसून ते यात आणखी शोध घेत आहेत.

जालन्यातील नागपूर गावचे माजी सरपंच रमेश शेळकेंची हत्या, गाडीत जाळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह