जळगाव : आपली कोंबडी मांजराने खाल्ल्याचा राग अनावर झालेल्या हेमराज सोनावणे नावाच्या गृहस्थाने चक्क बंदुकीची गोळी मांजराच्या पिलाच्या डोक्यात घातली. यात पिल्लाच जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील गिरणा पंपींग रोड जवळील योजना नगर भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हेमराज सोनवणे याला ताब्यात घेतले असून शहरातील तालुका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जळगाव शहरातील योजना नगर भागात हेमराज सोनवणे आणि पुष्कराज बानाईत हे दोन शेजारी राहतात. हेमराज सोनवणे यांना कोंबड्या पाळण्याची आवड आहे तर बानाईत यांना मांजरी पाळण्याची आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून बानाईत यांनी पाळलेली मांजर हेमराज सोनवणे यांच्या कोंबड्यांची पिल्ले फस्त करत होती. यामुळे हेमराज सोनावणे यांचा बानाईत आणि त्यांच्या मांजरीवर वर राग होता. त्यातच आज सकाळी हेमराज सोनावणे हे आपल्या घरच्या जवळ उभे असतानाच बानाईत यांच्या मांजरीच्या पिल्लाने सोनवणे यांच्या कोंबडीचे पिलू मारल्याचे सोनवणे यांनी डोळ्याने पाहिले. अगोदर राग असतानाच आजच्या या घटनेने हेमराज सोनावणे अधिक संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या घरात असलेली बंदूक काढून शेजारच्या घराजवळ बसलेल्या मांजराच्या पिल्लाला थेट गोळ्या घालून आपला संताप व्यक्त केला आहे.
यावेळी शेजाऱ्यांनी झाल्या प्रकारबद्दल सोनावणे यांना विचारणा केली असता तुमच्या सर्व मांजरी मारून टाकेल आणि तुम्हाला ही पाहून घेईल अशी धमकी सोनावणे यांनी दिल्याचा आरोप पुष्कराज बानाईत यांनी केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हेमराज सोनावणे याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.
या घटनेसंदर्भात संशयित आरोपी हेमराज सोनावणे यांच्या पत्नी अनिता सोनवणे यांनी म्हटल आहे की माझे पती हे फोटोग्राफी व्यवसाय करायचे मात्र मागील काळात कोरोनाचं संकट समोर आले आणि आमचा व्यवसाय बंद झाला. घरात सात लोकांचं कुटुंब कस सांभाळायचं म्हणून आम्ही कोंबड्या पाळल्या होत्या त्यावर आमचा उदरनिर्वाह असायचा. मात्र शेजारच्या मांजरीच्या पिल्लाने रोज कोंबड्या खायला सुरूवात केल्यानं आमचं पन्नास हजार रुपयांचा नुकसान झालं. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला, मांजर जखमी झाली आहे. आम्ही स्वतः प्राणी मित्र संघटनेत काम करतो आम्ही असं करणार नाही, त्यांची चूक झाली असं वाटत नाही.
या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी म्हटल आहे की कोंबडी खाल्ली म्हणून मांजरीला छर्या बंदुकीने गोळी घालून मारल्याची घटना झाल्याची तक्रार मांजर मालकांनी पोलिसात केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज पोलिसांनी केली असल्याचं म्हटल आहे.