Balaghat Jain Temple Theft : मध्य प्रदेशामध्ये ( Madhya Pradesh ) चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. चोरी केल्यांनंतर चोरानं चिठ्ठी लिहून चोरीचं सामान परत केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट ( Balaghat ) येथील जैन मंदिरातून ( Jain Temple Theft ) काही दिवसांपूर्वी काही चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर याच चोरीला गेलेल्या सर्व वस्तू पंचायत भवनाजवळ एका पिशवीत ठेवलेल्या आढळून आल्या. या पिशवीवर एक कागद चिकटवला होता, ज्यावर लिहिलं होतं की, 'चुकून चोरी केली, मला माफ करा.'


'माझ्याकडून चुकून चोरी झाली, मला माफ करा.'


मध्य प्रदेशातील बालाघाटमधील लामटा येथील जैन मंदिरातील लाखो रुपये किंमतीचे चांदीचं छत्र आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. मात्र मंदिरातून चोरी केल्यानंतर चोरट्याचं मन बदललं आणि त्याने चोरी केलेलं सर्व सामान मंदिराजवळ एका पिशवीत सोडून पळ काढला. इतकंच नाही तर चोरट्याने पत्र लिहून चोरीबद्दाल माफीही मागितली आहे. या माफीनाम्यात चोराने लिहिलं आहे की, 'मंदिरातून चोरी केल्यानंतर मला खूप नुकसान झालं. माझ्याकडून चुकून चोरी झाली, मला माफ करा.'


चांदीच्या नऊ छत्र्या आणि इतर वस्तू चोरीला


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील लामटा पोलीस ठाणे परिसरातील बाजार चौकात असलेल्या शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्याने चोरी केली. चोरट्याने मंदिरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. चोराने जैन मंदिरातून चांदीच्या नऊ छत्र्या आणि इतर वस्तू चोरून नेल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.


पोलिसांनी या प्रकरणाता तपास करताना, या परिसरात आधी झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. याशिवाय पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशीही केली. यानंतर मंदिरासमोरील एका खड्ड्यात पिशवीमध्ये चोरीचं सामान आढळून आलं. पोलिसांनी हे सामान जप्त केलं. या पिशवीमध्ये जैन मंदिरातून चोरीला गेलेलं सर्व सामान होतं. मंदिराजवळील पंचायत भवनाजवळील एका छोट्या खड्ड्यात हे चोरीचं सामान आढळून आलं. या पिशवीमध्ये एक चिठ्ठी आढळली, ज्यात चोराने चिठ्ठी लिहून माफी मागितली आहे.


परिसरातील काही लोक पाणी भरण्यासाठी नळाजवळ पोहोचले असताना त्यांना खड्ड्यात एक पिशवी आढळून आली. या पिशवीत काही चांदीच्या वस्तू दिसल्या. यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोरीला गेलेल्या वस्तूंची शाहनिशा केली.


चोरट्याचा शोध सुरू


दिगंबर जैन पंचायतीचे अध्यक्ष अशोक कुमार जैन यांनी सांगितलं की, नळाजवळ सापडलेल्या सर्व वस्तू जैन मंदिरातीलच असून, या वस्तू काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्या होत्या. चोरीला गेलेल्या वस्तू सापडल्यानंतर जैन समाजाने वाजत गाजत सर्व वस्तू मंदिरात पुन्हा स्थापन केल्या आहेत. चोरट्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय डाबर यांनी सांगितलं आहे.