डोंबिवली: करणीच्या नावाखाली एका भोंदू बाबाने महिलेसह तिच्या कुटुंबाला तब्बल 32 लाखांना गंडा घातल्याची घटना डोंबिवलीतून समोर आली आहे. या महिलेचे वडील कॅन्सर आजाराने आजारी होते. पण त्यांच्यावर करणी झाली आहे, मी त्यांना बरे करतो अस सांगत या भोंदू बाबाने महिलेसह तिच्या कुटुंबाला लुबाडलं आहे. सुशिक्षित कुटुंब देखील अशा भोंदू बाबागिरीला बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत. पवन पाटील अस या भोंदू बाबाचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील आहे. पवनने आणखी किती जणांना अशाप्रकारे लुबाडले आहे याचा तपास पोलीस करत आहेत. अशा भोंदूगिरीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलीसंकडून करण्यात येत आहे.


अंधश्रद्धेबाबत सातत्याने जनजागृती सुरू असताना देखील आजच्या आधुनिक युगात देखील डोंबिवलीसारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहरात नागरिक अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे. कथित तांत्रिक बुवा बाजीच्या आहारी जात असल्याने हे सर्व प्रकार घडत आहेत. डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडवरील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेसह तिच्या कुटुंबाची कथित तांत्रिक बाबाने फसवणूक करत त्यांना 32 लाखाना लुबाडलं आहे. संबधित तक्रारदार महिलेचे वडील आजारी होते. जळगाव जिल्ह्यातील भडगाव राहणारा पवन पाटील या कथित तंत्रिकांची तक्रारदार महिला आणि तिच्या कुटुंबाशी डिसेंबर 2019 मध्ये ओळख झालीॉ. पवनने 'तुमच्या वडिलांवर करणी झाली आहे, मी तुमच्या वडिलांना बरे करतो' असे सांगत त्याच्या अंगात देवी संचारत असल्याचे भासवले. या तिघांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकु आणि त्यामध्ये देवीची चांदीची प्रतिमा काढून दाखवली.


करणीच्या नावाखाली लाखो रुपयांना लुटले


कुणीतरी करणी केल्याची भीती देखील संबधित कुटुंबाला या भोंदू बाबाने घातली. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या बाबाने महिला आणि तिच्या आईच्या खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये पैसे जमा कर तब्बल 31 लाख 6 हजार 874 रूपये ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच 1 लाख 9 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. या सर्वानंतर संबधित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्याने तिने या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास करत भोंदूबाबा पवन पाटील याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha