नागपूरः असे म्हणतात की खाकीने ठरवलं तर कुठलीही 'टास्क' अशक्य नाही. दररोज घडफोड्या होणाऱ्या उपराजधानीत असाच प्रकार घडला आहे. एका वृद्ध महिलेच्या घरी चोरी करून तिच्या आयुष्यभराची जमापुंजी चोरून नेणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी गवतातून सुई शोधून काढावी अशा पद्धतीने शोधून काढले. चोरलेले सोने चोरट्यांनी वितळविले होते, तेही पोलिसांनी वृद्धेला परत मिळवून दिले हे विशेष.


नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आज स्वतः दहा लाखांचा मुद्देमाल घेऊन पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचले आणि 2 महिन्यांपूर्वी चोरी गेलेली आयुष्यभराची जमापुंजी त्यांच्या सुपूर्त केली. शहरांमध्ये चोऱ्या घरफोड्या होत असतात. त्यामध्ये सामान्यांचे लाखोंचे मुद्देमाल चोरून नेले जाते आणि अनेक वर्षांमध्ये मेहनतीने कमावलेली संपत्ती क्षणात नाहीशी होते. नागपूरच्या 60 वर्षीय जानकी खिलवानी यांच्यासोबतही तसेच घडले.


गर्दीत आयुक्तांना दिसली वृद्ध महिला


6 जून रोजी त्या दुपारी बारा वाजता घराला कुलूप लावून काही वेळासाठीच जवळच्या मंदिरात गेल्या आणि चोरट्यांनी डाव साधत घराचे कुलूप तोडून आयुष्यभराची जमापुंजी व दागिने चोरून नेले. हवालदील झालेल्या जानकी खिलवानी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही भेटल्या. पोलीस आयुक्त कार्यालयात लोकांच्या गर्दीत एक वृद्ध महिला उभी राहून काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे पोलीस आयुक्तांच्या लक्षात आले. त्यांनी विचारणा केली आणि जानकी खिलवानी यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार पोलीस आयुक्तांना सांगितला. पोलीस आयुक्तांनी काहीही झालं तरी एका वृद्ध महिलेच्या घरी झालेली ही चोरी उघडकीस आणायची आणि त्यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळवून द्यायचा असा निर्धार केला.


पोलिसांचे वीस पथकांची कामगिरी


पोलिसांचे वीस पथक निर्माण करण्यात आले. शहरातील शेकडो ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि गवतातून सुई शोधून काढावी या पद्धतीने पोलिसांनी जानकी खिलवानी यांच्या घरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना शोधून काढले. मात्र तोवर चोरट्यांनी चोरलेली रोख रक्कम खर्च केली होती तर सोन्याचे दागिने वितळवले होते.पोलिसांनी तो मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त केला आणि आज सोन्याचे दागिने आणि चोरी गेलेल्या रोख रकमेचा धनादेश खिलवानी कुटुंबियांना परत दिला.


Corruption : मागितली पाच हजारांची लाच, महावितरणचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात


गुन्ह्यांचा तपास शक्य, तेच सिद्ध केलंः आयुक्त


रोज गंभीर गुन्हे घडणाऱ्या नागपुरात असाही दिवस पाहायला मिळू शकतो असा विचार कधीही केला नव्हता अशी प्रतिक्रिया खिलवानी कुटुंबीयांनी दिली. तर पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्याचा तपास संवेदनशीलतेने केला, गुन्ह्यात चोरीला गेलेली छोटी मोठी रक्कम ही पीडित कुटुंबासाठी किती महत्वाची ठरते याची जाणीव पोलिसांनी ठेवली. तर बहुतांशी गुन्ह्यांचा तपास लावणं शक्य असतं आणि आम्ही तेच करून दाखवलं अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.