विरार : शहरात बँकेच्या पूर्व मॅनेजरने बँकेतील कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करीत बँकेतील एक कोटी अडतीस लाखाची रोख आणि सोन घेऊन, फरार होत असताना नागरीकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. विरार पूर्व स्टेशन परिसरातील आयसीआयसीआय (ICICI) बँकेत गुरुवार रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. बँक लुटणारा दुसरा तिसरा कुणी नसून बँकेचा पूर्वीचा मॅनेजर होता. या हल्ल्यात बँकेची असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एकीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेच्या वेळी बँकेचा सुरक्षारक्षक नसल्याने बँकेच्या कार्यप्रणालीवर महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या बँकेत मॅनेजर होता, त्याच बँकेत या आरोपीनं चोरी केली. तर आपल्याच सहयोगी साथीदारांवर चाकूने हल्ला करत एकीला ठार मारलं आहे. तर एकीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी आठ वाजता आयसीआयसीआय बँकेच्या विरार पूर्वे शाखेत असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशीरा सायंकाळपर्यंत बँकेतच काम करत होत्या. बँकेचा पूर्व मॅनेजर अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बँकेच्या आत प्रवेश केला. आणि चाकूने योगिताच्या गळ्यावर चेहऱ्यावर अंगावर वार केले. घटनेचं गांभीर्य ओळखून, श्रध्दा हिने बँकेच इमरजन्सी अलार्म बेल वाजवली. यामुळे बाहेरचे नागरीक सतर्क झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी अनिल दुबेने श्रध्दावरही अनेक वार केले. त्यात तीही जखमी झाली. आरोपी बँकेतील एक कोटी अडतीस लाखांचे सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरुन बँकेबाहेर आला. त्याचवेळी नागरीकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिलं
बँकेचा निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप
यावेळी श्रद्धा आणि मृत योगिताच्या घरच्यांनी रात्रीच्या सुमारास बँकेत सुरक्षारक्षक का नव्हता? असा प्रश्न करत जर सुरक्षारक्षक असता तर नक्कीच ही घटना घडली नसती, असं म्हणत यात बँकेचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत झालेल्या योगीताचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला 3 वर्षांचा एक मुलगा आहे तर त्यांचा पती हा फार्मा कंपनीत काम करतात तर जखमी श्रद्धा यांनाही 5 वर्षांचा मुलगा आहे.
कर्जबाजारी झाल्याने उचललं टोकाचं पाऊल
आरोपी अनिल दुबे हा सध्या नायगांव येथे अॅक्सिस बँकेचा मॅनेजर आहे. आरोपी दुबे हा कर्जबाजारी झाला होता. तो आर्थिक चणचणीत होता. त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विरार पोलिसांनी आज वसई न्यायालयात अनिल दुबेला हजरं केलं असता, वसई न्यायलयाने आरोपीला 6 ऑगस्टपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.