बीड : स्वतःच्या पोटच्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्यानंतर पत्नीवर निर्दयीपणे वार करणाऱ्या पतीने घरातच आत्महत्या करून कुटुंब संपवून स्वतःचं आयुष्य संपवले. ही खळबळजनक घटना परळी तालुक्यातील शिरसाळा येथे मध्यरात्री घडली आहे. नेमक्या कोणत्या कारणाने हे कुटुंब संपवण्यात आले याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. अल्लाहबक्क्ष अहमद शेख (वय 28), शबनम शेख (वय 22) आणि अशफिया (वय 2) अशी मृतांची नावे आहेत.


सिरसाळ्यात राहणारा अलाहबक्क्ष हा परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात वेल्डींगचे काम करायचा. काल शुक्रवारी परभणी जिल्ह्यातल्या पाथरीमध्ये त्यांच्या नातेवाईकांचा विवाहसोहळा होता. त्यासाठी अल्लाहबक्क्ष याचे सासू-सासरे मुंबईहून येणार होते. दरम्यान, सासऱ्याने फोन करुन सोबत जाऊ असे सांगितले. तेव्हा अल्लाहबक्क्ष याने तुम्ही पुढे जा मी मागून येतो, असे सांगितले. त्यानंतर तो लग्नसोहळ्याला गेलाच नाही.


विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यासाठी त्याच्या शेजारी भाऊ सगळे पाथरीला गेले होते. आधीपासूनच अल्लाहबक्क्ष व पत्नी शबनम यांच्यात सतत वाद सुरु होते, अशी माहिती आता नातेवाईक देत आहेत. कालसुद्धा पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अल्लाहबक्क्ष याने पत्नी शबनमच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिची हत्या केली. यावेळी अशफिया जवळच होती. ती जोरजोराने रडू लागली, त्यामुळे त्याने चिमुकलीच्या गळ्यावरही चाकूने वार करुन संपविले. यानंतर त्याला पश्चाताप झाला, त्यामुळे त्याने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसानी दिलीय..


अल्लाहबक्क्षचे वडील जेव्हा लग्न होऊन घरी आले त्यानंतर त्यांनी अल्लाहबक्क्षच्या घराकडे बघितले तर एका दरवाज्याला बाहेरून कडी लावली होती. मात्र, दुसरा दरवाजा आतून लावून घेतला होता. आवाज दिल्यानंतरही आतून कोणीच बोलत नसल्याने त्याने खिडकीतून बघितले आणि त्यांना धक्काच बसला. पंचनामा करुन तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. भाऊ मुजीब अहमद शेख यांच्या तक्रारीवरुन मयत अल्लाहबक्क्षवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेने सिरसाळा सुन्न झाले आहे.