HSC Examination :  बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याआधीच एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलमधील वंश म्हात्रे या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल  उचलले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विद्यार्थ्यांवरीण ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 


पनवेल शहरातील देवदर्शन सोसायटीत राहणाऱ्या वंश म्हात्रे या 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. वंश म्हात्रे हा गेल्या काही दिवसापासून अभ्यासामुळे तणावाखाली होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. सोमवारी, 20 फेब्रुवारी रोजी, रात्री आई-वडील घरात नव्हते. त्याच वेळी वंश म्हात्रे याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. वंशचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी लॅचने दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना आपल्या मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. 


पनवेल पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आता या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे. अभ्यास आणि इतर तणावांमुळे आत्महत्येसारखे पाऊल न उचलण्याचे आवाहन करण्यात येते. पालक, समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ आदींसोबत संवाद साधून मार्ग काढता येतो. मात्र, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे टाळायला हवे असे आवाहन करण्यात येते. 


औरंगाबादमध्येही विद्यार्थ्याची आत्महत्या


बारावीची परीक्षा काही तासांवर आलेली असताना एन-8 सिडको भागातील गुरूनगर हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. सोमवारी दुपारी ही उघडकीस आली. दरम्यान या विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांसह नातेवाइकांनी वर्तविला आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमन रवींद्र आहेरेवाल (वय 18, रा. एन 8, गुरूनगर हौसिंग सोसायटी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  


अमन आहेरेवाल हा कुलभूषण गायकवाड महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला असून, एक भाऊ पुण्यात नोकरी करतो. दरम्यान बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने तो या परीक्षेची तयारी करत होता. मात्र परीक्षेला अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक राहिला असताना अमनने टोकाचे पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. रविवारी सायंकाळी जेवण केल्यानंतर अमन आपल्या तिसऱ्या मजल्यावरील अभ्यासाच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मात्र तो सोमवारी सकाळी खाली आलाच नाही. दुपारी जेवणासाठी आजोबा अमनला बोलावण्यासाठी गेले असता, अमना फासावर लटकलेला दिसला. त्यास नातेवाइकांनी बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.