पुणे: पुण्यासह राज्यभरात चर्चेत आलेल्या कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. अपघातावेळी पोर्शे कारमध्ये मागील बाजूस बसलेल्या त्याचबरोबर कार अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अरुणकुमार देवनाथ सिंगने (वय 47, रा. विमाननगर) आशिष मित्तल व ससूनमधील डॉक्टरांसह अन्य आरोपींना किती रक्कम देण्यात आली होती. याची चौकशी आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती तपासली जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अरुण कुमार याला पसार होण्यासाठी कोणी मदत केली, याचा तपास करायचा असल्याने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी काल (शुक्रवारी) न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी सिंग याला 14 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 18मे रोजी मध्यरात्री एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवून एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. कारचालक अल्पवयीन मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी पबमध्ये जाऊन मद्यपान केलं होतं. अपघात झाल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी अरुण कुमारच्या सांगण्यावरून आशिष मित्तल याने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्याच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला असल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी अरुणकुमारने आशिष मित्तल याला रक्ताचा नमुना बदलण्यासाठी मोठी रक्कम दिली आहे का, डॉ. हाळनोर, डॉ. तावरे, वॉर्डबॉय अतुल घटकांबळे, अमर गायकवाड, व अशपाक मकानदार यांना मदत करण्यासाठी किती रक्कम दिली, याबाबत त्याच्या विविध बँक खात्यातील व्यवहारांची माहिती घेतली जाणार आहे.
त्याचबरोबर अपघातानंतर अरुण कुमार ससून रुग्णालयात गेल्यानंतर कोणाच्या संपर्कात होता, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने कोणत्या ठिकाणी ठेवले होते, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कुठे होता, त्याला मदत कोणी केली, याबाबत आरोपीची चौकशी करायची आहे. त्यासाठी आरोपीची पोलिस कोठडीची मागणी तपास अधिकारी गणेश इंगळे व विशेष - सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केली होती.
या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सिंगने मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता, मात्र नुकताच तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अटकेपासून संरक्षणाचे सर्व मार्ग संपल्यावर सिंग विशेष न्यायालयामध्ये शरण आला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सिंगला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन काल (शुक्रवारी) दुपारी विशेष न्यायालयापुढे हजर करून आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती.