पुणे : सोशल मीडियावर झालेली ओळख ही अंगलट आल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पनवेल मधल्या एका तरुण बांधकाम व्यावसायिकालाही सोशल मीडियावर एका तरुणीशी झालेली ओळख चांगलीच अंगलट आली आहे. सोशल मीडियावर ओळख झालेल्या या तरुणीने बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे.
केवळ नववी पास असलेली ही तरुणी सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत आहे. तिचा पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगतोय. पती कारागृहात गेल्यावर पतीच्या गुन्हेगार मित्रासोबत तिची ओळख झाली अन् यातूनच हनीट्रॅप' करणाऱ्या नव्या टोळीचा उदय झाला. अनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरून तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले. मात्र चार दिवसापूर्वी मुंबईच्या एका व्यावसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले. अन् अवघ्या 72 तासांच्या आत पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण हनीट्रॅप करणारी ही टोळी गजाआड केली आहे.
या टोळीने पनवेल येथील व्यवसायिक नितीन दत्ता पवार (वय 31) यांना मारहाण करत खंडणी उकळणार्या सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रविंद्र भगवान बदर (वय 26,रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय 40,रा. गोकुळनगर कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय 32, रा.बाणेर मुळ सोलापूर माढा),मंथन शिवाजी पवार (वय 24,रा. इंदापूर) आणि (19 वर्षीय) तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या टोळीने अनेकांना हनीट्रॅपच्या माध्यमातून लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र काही जण भीतीपोटी किंवा अब्रुला घाबरून पुढे येत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, किंवा कोणाकडून खंडणी उकळली गेली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :