ठाणे : घरफोडी आणि दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक करण्यात नौपाडा पोलिसांना यश आलं आहे. ठाण्यातील (Thane) नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 डिसेंबर रोजी 7 ते 8 दुकानांचे शटर उचकटून लाखोंचा माल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी ठाणे, कल्याण डोंबिवली, आंबिवली, उल्हासनगर, चुनाभट्टी याठिकाणचे तब्बल 13 ते 14 सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या माध्यमातून तपास सुरु केला होता.


या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी रवी उर्फ गणू तानाजी धनगर (वय 19) अंबिवली, राज विजय राजपुरे (वय 20) कुर्ला (मूळचा इंदौर मध्यप्रदेश) राजकुमार कमलेश सरोज (वय 20) उल्हास नगर-5(मूळचा इलाहाबाद उत्तरप्रदेश) आणि बाळकृष्ण उर्फ कृष्ण गोविंद पाल (वय 22) अंबरनाथ पूर्व (मूळचा मध्यप्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ठाणे, बदलापूर, कल्याण तालुका पोलीस, ठाणे, कोनगाव, पेण आणि चुनाभट्टी पोलीस ठाणे अशा तब्बल 9 गुन्ह्यांची उकल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालात पोलिसांनी 5 मोबाईल, 3 मोटारसायकल आणि काही रोख रक्कम  हस्तगत केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha