राजस्थान : आज भारताचा जागतिक पातळीवर मान-सन्माम वाढला आहे. मात्र काही भागात अद्यापही स्त्री-भ्रूण हत्यांच्या घटना घडतात. सरकारच्या प्रयत्नाने या घटनांचं प्रमाण कमी झालं असली, तरी पूर्णपणे संपलेलं नाही. राजस्थानमध्ये आजही अनेक ठिकाणी मुलां-मुलींमध्ये भेदभाव केला जातो. मुलगा झाल्यावर खूप आनंद साजरा केला जातो, तर मुलगी झाल्यावर लोक निराश होतात. कदाचित 75 वर्षांच्या ढोलीबाईंनीही नातवाच्या जन्मानंतर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी असाच आनंद साजरा केला असेल. पण 23 वर्षांनंतर हाच नातू तिच्या जीवावर उठेल, हा विचार तिने स्वप्नातही केला असेल.


आजीच्या पायात दोन किलो चांदीचे कडे


दहा दिवसांपूर्वी जंगलात पोलिसांना एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेचे दोन्ही पाय कापलेले होते. महिलेचा पती धुलजी नागडा याने पत्नीच्या हत्येची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आता या महिलेच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, वृद्ध महिलेचा नातूच खूनी असल्याचं निष्पन्न झालं आहे. नातवाने निर्दयीपणे आजीचे पाय कापले. त्याला आजीने पायात घातलेले चांदीचे कडे हवे होते. उदयपूरच्या गिंगला या ग्रामीण भागातील हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.


पैशासाठी नातवाचं टोकाचं पाऊल


घटनेच्या दिवशी नरेशची आजी ढोलीबाईं गुरे चरण्यासाठी जंगलात घेऊन गेली. सायंकाळी तेथून गुरे आली, मात्र ढोलीबाई घरी परतली नाही. त्यानंतर घरच्यांनी जंगलात शोध घेतला असता तिचा पाय कापलेला मृतदेह आढळून आला. तिचे पाय कापून आरोपींनी चांदीच्या बांगड्या काढल्या होत्या. आजीचा मृतदेह सापडल्यानंतर नातू नरेशही खूप दु:खी आणि रडताना दिसला. अंत्यसंस्काराच्या सर्व विधींमध्ये तो सहभागी झाला होता. त्याच्यावर पोलिसांना संशय आला. त्यांनी नरेशकडे चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 


कुऱ्हाडीने आजीचे दोन्ही पाय कापले


ढोलीबाईचा 23 वर्षांचा नातू घरातून सतत पैशांची मागणी करत असे. मैत्रिणींना बाहेर फिरवण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. मात्र घरी कोणीही त्याला पैसे दिले नाहीत. यानंतर नातू नरेशने आजीच्या पायातील चांदीचे कडे विकण्याचं ठरवलं. पण त्याने आजीच्या पायातील बांगड्यांसाठी तिचा काटा काढण्याचं ठरवलं. नातू नरेशने आजीची हत्या करत तिचे दोन्ही पाय कुऱ्हाडीने छाटले आणि चांदीचे कडे घेऊन तो पसार झाला. त्याने ते चांदीचे कडे एक लाख रुपयांना विकले आणि ते पैसे घेऊन तो आपल्या मैत्रिणीला फिरायला घेऊन गेला होता. हत्येनंतर अवघ्या दहा दिवसांनी मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणाचा उलगडा होताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.