Gondia Crime News : खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटांचा व्यवहार करून तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील (Crime News) फरार मुख्य सूत्रधार राजेश नायर (वय 48 रा. चांदनाका, शारदा मंदिराजवळ, छिंदवाडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Gondia Police) अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाच्या वतीने फरार आरोपीचा गेल्या 2 महिन्यापासून शोध सुरू होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. नायरच्या अटकेने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

Continues below advertisement

दरम्यान, आमगाव येथील वीरेंद्र राधेश्याम लिल्हारे (45) यांच्या तक्रारीनुसार, 23 सप्टेंबर 2025 रोजी आरोपी राजेश नायर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 25 सप्टेंबर रोजी छिंदवाडा मध्यप्रदेश येथून 3 आरोपींना अटक केली होती. दरम्यान, मुख्य आरोपी राजेश नायर 1 कोटी रुपये घेऊन फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी राज्यभर मोहीम सुरू केली होती. अखेर शनिवारी नायरला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

Gondia Crime News : गोपनीय माहिती मिळताच लावला सापळा

Continues below advertisement

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक आरोपीचा शोध घेत असताना नायर अटकपूर्व जामिनासाठी गोंदिया शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीनुसार पोलिस पथकाने शहरातील फुलचूर नाका भागात गस्त वाढविली. सकाळीच संशयास्पद हालचाल दिसताच पथकाने तत्काळ सापळा रचला आणि नायरला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले..

Gondia Crime : गोंदियाच्या एकोडी येथे विहिरीत आढळला अर्भकाचा मृतदेह; गंगाझरी पोलिसांनी घेतली घटनेची नोंद

तिरोडा तालुक्यातील एकोडी येथील राजेंद्र ठाकरे यांच्या घरच्या विहिरीत मृत अर्भक आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकोडी येथील राजेंद्र ठाकरे यांच्या घराच्या आवारात विहीर आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे कुटुंबीय विहिरीचे पाणी भरण्यासाठी शनिवारी सकाळी गेले असता त्यात मृत अर्भक तरंगताना आढळला. ठाकरे यांनी याची माहिती लगेच गावकरी आणि गंगाझरी पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक सुधीर वर्मा पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला.

तसेच गोंदिया येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात अर्भक हे 1 दिवसाचे असल्याचे व मृत्यू झाल्यावरच विहिरीत टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अर्भक मुलाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्भक विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी गंगाझरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या