Thane Auto Driver Crime : ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग करण्यात आला, हा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात एक रिक्षावाला एका शाळकरी मुलीला फरफटत नेत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. त्या मुलीला फरफटत नेण्यामागे त्या रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांना रिक्षाचालकाचा अटक केली आहे. 


ठाण्यात महिला असुरक्षित?


मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच महिला असुरक्षित असल्याचं धक्कादायक चित्रं यामुळे समोर येत आहे. ठाण्यातील स्टेशन रोड परिसरात एक रिक्षावाला एका शाळकरी मुलीला फरफटत नेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली केल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.


मुलीला रिक्षातून फरफटत नेतानाचा धक्कादायक व्हिडीओ



महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर


व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, ठाणे स्टेशन रोड परिसरात शाळकरी मुलगी रस्त्याने जात होती. यावेळी बाजूला एका रिक्षाचालक आला त्याने तिचा हात पकडून अश्लील चाळे करु लागला. नंतर रिक्षाचालकानं तसंच रिक्षासह मुलीला काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. यानंतर शाळकरी मुलगी रस्त्यावर खाली पडली. या सर्व प्रकारात शाळकरी मुलीला दुखापत झाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी रिक्षाचालकाचा तपास करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच महिला असुरक्षित असल्याचं चित्र यामुळे समोर येत आहे. 


दरम्यान, एबीपी माझानंही ठाण्यातील या मुजोर रिक्षावाल्याला तात्काळ शोधण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलं होतं. अशा मुजोर रिक्षावाल्यांना वेळीच चाप बसणं गरजेचं आहे. नाहीतर यापुढेही असे अनुचित प्रकार घडू शकतात. सध्या या मुजोर रिक्षावाल्याला अटक करण्यात आली आहे. पण या रिक्षावाल्यावर आणखी कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण अशा मुजोर रिक्षावाल्यांविरोधात जर कठोर कारवाई झाली नाहीतर पुन्हा अशी घटना घडू शकते. आरोपींना अद्दल घडण्यासाठी या मुजोर रिक्षाचालकावर कठोर कारवाई करण्याचं आवाहन एबीपी माझा करत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या