Naxal arrested Gadchiroli : नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणारी नक्षल समर्थक टोळीला अटक करण्यात आली आहे. या नक्षल समर्थकांकडून नक्षल साहित्य आढळून आले. सुरक्षा दलाच्या जवानांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून एक जण फरार आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील उपपोस्टे दामरचा हद्दीतील मौजा भंगारामपेठा गावात ही कारवाई करण्यात आली. 


दामरंचा पोस्टे पार्टी व शीघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. त्यावेळी तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तीसगड येथे वाहतूक करत असलेल्या चार इसमांकडून 10 नग कार्डेक्स वायरचे बंडल (एकूण 3500 मीटर लांबीचे)  व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले.


चार जण अटकेत, एक फरार


सुरक्षा दलाच्या जवानांनी या प्रकरणी  राजू गोपाल सल्ला (वय 31 वर्षे)  करीमनगर (तेलंगणा),  काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (वय 24 वर्षे) अहेरी-गडचिरोली, साधू लच्चा तलांडी (वय 30 वर्षे),  मोहम्मद कासिम शादुल्ला, करीमनगर (तेलंगणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर,  छोटू ऊर्फ सिनू मुल्ला गावडे हा आरोपी मौजा भंगाराम पेठा अहेरी येथील रहिवासी असून तो फरार आहे. गडचिरोली पोलिसांकडून याचा शोध सुरू आहे. 


गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांकडून घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करण्यात येतो. नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरद्वारे नक्षली बनावटीचे बीजीएल, हँडग्रेनेड,  बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो. येत्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी हाक दिलेल्या बंद दरम्यान या स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडून मोठया प्रमाणात वापर केला जाण्याची दाट शक्यता होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha