भिवंडी : भिवंडीत सेनेच्या शाखाध्यक्षासह एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांनाच क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेलेल्या इसमावर गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर अंधाधुंद गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात घडली आहे . या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भिवंडीतील पायगाव येथे क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या दोन गटात वाद होऊन गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गाडी पुढे मागे करण्याच्या वादातून गोळीबारची घटना घडल्याचे समजतंय .गावातील वर्चस्वा वरून जुना वाद असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे . प्रफुल्ल बाळाराम तांगडी (वय 34 रा.खार्डी) असे जखमीचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
पायगाव येथे फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या क्रिकेट ग्राऊंडकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने जखमी व हल्लेखोर यांच्या गाड्या समोरासमोर आल्या असता गाड्या मागे घेण्यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली . "आधी तू गाडी मागे घे , आधी तू गाडी मागे घे '' अशी जोरदार बाचाबाची झाल्यांनतर बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत व त्यांनतर एका तरूणानाने चक्क प्रफुल याच्यावर रिव्हॉल्वरने 5 राउंड फायर केले. या गोळीबारात प्रफुल गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीवर, पोटावर व हातावर तीन गोळ्या लागल्या असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते . त्यास उपचारासाठी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . तर गोळीबार करणारा हल्लाखोर विक्की भरत म्हात्रे फरार झाला असून भिवंडी तालुका पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे .
दरम्यन भिवंडीत लागोपाठोपाठ गोळीबाराच्या घटना घडत असल्याने हल्लेखोरांजवळ हे अवैध रिव्हॉल्वर येतातच कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पोलीस प्रशासन याविरोधात कठोर भूमिका का घेत नाहीत असा सवाल देखील उपस्थित होत आहे.