Fake Currency Seized : मुंबई आणि गुजरातमधून तब्बल 317 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमध्ये सहा जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईतून मुख्य आरोपी विकास जैन याला अटक करण्यात आली आहे. 


मुख्य आरोपी विकास जैन याचा वेगवेगळ्या शहरात कुरियर फर्म चालवत होता. याच फर्मच्या माध्यमातून विकास जैन बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता, अशी माहिती पीटीआयनं दिली आहे. मुंबई, आणंद, सूरत आणि जामनगर या चार शहरात विकास जैन मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता. गुजरात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, विकास जैन या चार शहरातून देशभरात बनावट नोटा पाठवत होता. गुजरात पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली.  त्यांनी मुंबईतून विकास जैन याला बेड्या ठोकल्या तर अन्य पाच आरोपींना पाच शहरातून अटक केली.


अटक करण्यात आलेल्यामधील एक आरोपी सूरतमधील ग्रामीण भागामध्ये रुग्णवाहिका चालवण्याचं काम करत होता. त्याचं नाव हितेश कोटाडिया असे आहे. त्याच्याकडून 26 कोटींच्या जवळपास बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटामध्ये दोन हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये नोटाबंदी जाहीर केली होती. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. तर 500 आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विकास जैन याच्यासह सहा जणांविरोधात पोलिसांनी कलम 489 (A)(B)(C) , 406,  420, 201 आणि 120 (B) नुसार गुन्हा दाखल केलाय.  


कसं सुरु होतं रॅकेट?
विकास जैन याला अटक केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा झाला. बनावट नोटांचं रॅकेट कसं चालवलं जात होतं? त्याच्यासोबत कोण कोण सहभागी होते? याची माहिती विकास जैन यानं चौकशीदरम्यान सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास जैन गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली येथील आपल्या कुरिअर कार्यलयातून बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता. उत्तर भारतामधील वेगवेगळ्या शहरात बनावट नोटा छापल्या जात होत्या. या बनावट नोटा आपल्या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून मुंबईला पाठवत होता. मुंबईतील एका गोदामात नोटा साठवत होता. गुजरात पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीनं मुंबईतील अड्ड्यावरुन 317 कोटींपैकी 227 कोटी किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.