Crime News : रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत गरजवंताना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. उमाशंकर बर्मा असे या भामट्याचे नाव असून धक्कादायक म्हणजे उमाशंकर रेल्वे चालवत असल्याचा व्हिडीयो लोकांना दाखवत आपण रेल्वे मध्ये मोटरमन असल्याचे भासवत होता. अखेर उमाशंकरचे बिंग कोळशेवाडी पोलिसांनी फोडले असून त्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्यासह रणजितकुमार शर्मा, रवी सोनी या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
कल्याण पूर्व नांदीवली परिसरात गजेंद्र जैन आपल्या कुटुंबासह राहतात. गजेंद्र यांची पत्नी नोकरीच्या शोधात होती. याच दरम्यान गजेंद्र यांची उमाशंकर बर्मा यांच्याशी ओळख झाली. उमाशंकरने स्वतः ट्रेन चालवत असल्याचा व्हिडीयो गजेंद्र यांना दाखवत आपण रेल्वेत काम करत असल्याचे भासवले. उमाशंकर याने आपली रेल्वेत ओळख असून त्यांच्या पत्नीला रेल्वे नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत पैशांची मागणी केली. गजेंद्र यांना विश्वास बसल्याने त्यांनी उमाशंकर याला वर्षभरात 21 लाख 60 हजार रुपये दिले. मात्र नोकरी बाबत काहीच हालचालन झाल्याने गजेंद्र यांनी उमाशंकर याला जाब विचारला, मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. याचदरम्यान उमाशंकर याने आनखी एका व्यक्तीला रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र दिले होते. गजेंद्र यांना संशय आल्याने त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्या प्रकरणी तक्रार नोंदवली.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस अधिकारी हरीदास बोचरे पोलिस अधिकारी के. सूर्यवाड यांच्या पथकाने कल्याण रेल्वे स्टेशन येथे उमाशंकर साठी सापळा रचला. गजेंद्र याने उमाशंकर याला कल्याण रेल्वे स्थानकावर भेटायला बोलवले. उमाशंकर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात येताच पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. या प्रकरणी तपासा दरम्यान उमाशंकर याचे रणजित कुमार शर्मा, रवी सोनी हे दोन साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोघे नोकरीच्या शोधात असलेले गरजवंत हेरून त्यानं उमाशंकरपर्यंत पोहचवत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी उमाशंकर बर्मा विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. दरम्यान उमाशंकरने रेल्वे चालवताना व्हिडीओ कसा बनवला? हा व्हिडिओ खरा आहे का? त्याने आणखी किती जणांची फसवणूक केली याचा तपास पोलीस करत आहेत.