Crime Nres : रिकामी घरे हेरून बनावट चावीने घराचे कुलूप उघडून घरफोडी करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींना कल्याण क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत. सारिका सकट, मिणा इंगळे आणि सुजाता सकट अशी तिन्ही बहिणींची नावे आहेत.
डोंबिवली येथे एका घरात चोरी करून या तिघी बहिणी आपल्या कुटुंबासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या तिन्ही बहिणीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 23 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या तिघींनी आधी किती ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत .
असा लावला छडा!
डोंबिवली पूर्व राम नगर परिसरात मधील बंद घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी साधत बनावट चावीने दरवाजा उघडून घरातील 23 तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरी करणाऱ्या तीन महिला कैद झाल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध सुरू केला.
कल्याण क्राईम ब्रांचने डोंबिवली स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना या महिला स्टेशनहून ट्रेनने मुंबईच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. पुढे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही तपासले असता घाटकोपर येथे महिला उतरल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. या तिन्ही महिला मानखुर्द आणि कुर्ला परिसरातील असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना या तिन्ही महिला सहकुटुंब जेजुरीला देवदर्शनासाठी गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस नाईक विनोद चनने, पोलीस कर्मचारी अनुप कामत यांच्या पथकाने तत्काळ जेजुरी येथे सापळा रचत या तिन्ही महिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी महिलांकडून चोरीचे 23 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या तिघी कधी पासून चोऱ्या करत आहेत आणि अजून किती ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या आधी त्यांच्या विरोधात मुंबई-ठाणे परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.