डोंबिवली : चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाचा इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार जखमी झाला आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना घडली. वॉचमन आपल्याला पाहिली आणि आपण पकडले जाऊन या भीतीने दोघांनी पाईपवरुन उतरण्याचा प्रयत्न केला. त्यातच हात सटकल्याने खाली पडून एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी आहे.
डोंबिवली खंबाळपाडा इथल्या केडीएमसीच्या बीएसयूपीच्या इमारतीत वायरिंग चोरी करण्यासाठी दोन तरुण गेले होते. मात्र चोर शिरल्याचे लक्षात येताच वॉचमन इमारतीमध्ये गेला. वॉचमन आल्याचे लक्षात आल्याने घाबरलेल्या या दोघांनी इमारतीच्या पाईपवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघे खाली पडले. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. मोहम्मद सलिम भाटकर अस या मृत तरुणाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजनेअंतर्गत डोंबिवली खंबाळपाडा परिसरात इमारती उभारल्या आहेत. मात्र अद्याप लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला नाही. या इमारती भग्नावस्थेत उभ्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून या इमारतींना चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. चोर या इमारतीच्या दरवाजे ग्रील चोरुन नेतात. अशाच प्रकारची चोरी करण्यासाठी दोन चोर इमारतीत गेले होते.
या इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंग चोरी करण्यासाठी अरफाह पिंजारी आणि मोहम्मद भाटकर हे दोन तरुण काल रात्रीच्या सुमारास गेले. हे दोघे इमारतीमध्ये शिरल्याचे वॉचमनला लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघांनी घाबरुन इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यात हात निसटल्याने मोहम्मद भाटकर आणि पिंजारी दोघे खाली पडले. यामध्ये मोहम्मद भटकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर पिंजारी जखमी झाला आहे.
याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाटकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. मोहम्मद भाटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात याआधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.