Dombivli Crime News Update : अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून तक्रारदारच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची घटना डोंबिवली कोपर परिसरात घडली आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. मात्र घटनेमुळे तक्रारदार व त्याचे कुटुंबीय दहशतीच्या छायेत आहेत. तक्रारीत शिंदे गटाचा एका माजी नगरसेवक या भूमाफियाला पाठीशी घालत असल्याचा आरोप पिडीत कुटुंबियांनी केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या घरावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुधाकर पावशे आपल्या कुटुंबासोबत राहतात. काही महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एका इमारतीचे काम सुरु झाले. सुधाकर पावशे यांनी या प्रकरणाची तक्रार महापालिकेकडे केली. महापालिकेने कारवाईचे आश्वासन दिले मात्र कारवाई केली नाही. सुधाकर पावशे यांच्या तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली. लोक आयुक्तांनी ही अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवडणूकीचे कारण देत कारवाई टाळली. पावशे यांनी पाठपुरावा केल्यावर केडीएमसीने मंगळवारी सकाळी कोपरमधील या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली. त्यानंतर सुधाकर पावशे यांच्या घरासमोर काही महिला आल्या.
महिलांनी आरडाओरड करत सुधाकर पावशे यांना घराबाहेर या असे सांगितले. सुधाकर पावशे घराबाहेर आले नाहीत. तेव्हा महिलांनी त्यांचे दार जोर जोरात ठोठावले. त्यांची नेम प्लेट तोडली. घराच्या बाहेरच्या वस्तूंची नासधुस केली. या प्रकरणी हल्ला करणारया महिलांच्या विरोधात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुधाकर पावशे यांनी, एक तर माझ्या जागेवर अनधिकृत बांधकाम होत आहे. त्याची तक्रार केली. तर महापालिका दुर्लक्ष करते. कारवाई थातूरमातूर केली जाते. भूमाफिया माझ्या घरावर हल्ला करतात.या भुमाफियाला शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार सुधाकर पावशे यांनी केलाय .आज आम्ही घराबाहेर पडून शकत नाही. मी आपल्या घरातच कुटुंबियांसह राहतो. बाहेर पडत नाही. सरकारने या घटनेकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्र्यानी या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी पावशे यांनी केली आहे.