Dombivli Crime : व्यवहारात मागील वर्षी दिलेले पावणे तीन लाख रुपये परत करत नसल्याने एका इसमाला घरात डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने इसमाच्या पत्नीकडे सुटकेसाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपी अजय जाधव याला टिळकनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडून अतुल यांची सुखरुप सुटका केली आहे.


डोंबिवलीत (Dombivli) राहणारे अतुल व्यापारी हे बँकेतून कर्ज पास करुन देणे, व्याजाने पैसे देणे यांसारखे व्यवहार करतात. रेल्वेमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या अजय जाधवने 2021 मध्ये अतुल यांच्यासोबत एक व्यवहार केला होता. त्यासाठी 2 लाख 80 हजार रुपये त्याने अतुलला दिले होते. मात्र पैसे परत देत नसल्याने अजयने अतुलला 9 जुलै रोजी भेटण्यासाठी बोलावलं. अतुल व्यापारी इथे आल्यानंतर अजय जाधवने त्याला मारहाण केली. यानंतर त्यांना माटुंगा येथील रेल्वे वसाहतीतील घरात डांबून ठेवले. इतकेच नव्हे तर अजयने अतुलच्या पत्नीला फोन करत नवरा सुखरुप पाहिजे असेल तर पाच लाख रुपये दे, अशी मागणी केली. अतुल यांच्या पत्नीने तीन लाख रुपये देण्याची तयारी दाखवली, मात्र अजय पाच लाख रुपयांवर अडून बसला. अखेर शुक्रवारी (15 जुलै) तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.


तक्रार दाखल होताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे, पोलीस नाईक जाधव, घुगे, महाजन, चंदने यांच्या पथकाने अतुल यांचा शोध सुरु केला. पोलिसांनी प्लॅन आखला आणि पाच लाख रुपये घेण्यासाठी अजयला डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. या हॉटेलात पोलिसांनी सापळा लावत अजयसह अतुलला ताब्यात घेतले. रविवारी (17 जुलै) कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने अजयला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पिठे यांनी सांगितले.