Dombivli Crime News : डोंबिवलीमध्ये हॉटेल चालकाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  त्यामुळे खोणी पलावा येथील हायप्रोफाईल सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऑर्डर केलेले जेवण पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षा रक्षकांनी इमारतीमध्ये जाण्यात मज्जाव केला. यावेळी झालेला वादातून सुरक्षा रक्षक आणि त्याच्या साथीदारांनी या हॉटेल चालकाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हॉटेल चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे ज्या महिलेने जेवण ऑर्डर केले, त्या महिलेने समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. याप्रकरणी  हॉटेल मालकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.


डोंबिवली जवळ असलेल्या खोणी पलावा ही हाय प्रोफाईल सोसायटी आहे. पलावापासून काही अंतरावर अभिषेक जोशी यांचे थालीवाली ढाबा नावाचे हॉटेल आहे. अभिषेक जोशी देखील याच पलावा सोसायटीमधील एका इमारतीमध्ये राहतात. काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना पलावामधील एका इमारतीमधून जेवणाच्या पार्सलसाठी फोन आला. अभिषेक यांनी पार्सल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसह या संबंधित इमारतीमध्ये आले. मात्र तेथे सुरक्षारक्षकाने त्यांना एंट्री करण्यास सांगितले. अभिषेक यांनी आपल्या कर्मचाऱ्याला एन्ट्री करण्यास सांगितले असता सुरक्षारक्षकाने अभिषेक यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.


जेवणाच्या पार्सल देऊन अभिषेक खाली आले असता सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. काही क्षणातच सुरक्षारक्षकासोबत सुरक्षारक्षकाचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करत अभिषेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चार ते पाच जणांनी अभिषेक यांना लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिषेक यांना गंभीर दुखापत झाली आहे. याच दरम्यान ज्या महिलेने पार्सल ऑर्डर केली होती. ती महिला देखील मध्यस्थी करण्यासाठी गेली. मात्र त्यानंतरही या सुरक्षारक्षकांनी अभिषेक यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी अभिषेक याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.