Dombivli Crime : एखाद्या सिनेमाचे कथानक असावे अशा पद्धतीने चार अपहरणकर्त्यांनी 50 लाखांच्या खंडणीसाठी डोंबिवलीमधील (Dombivli) एका प्लायवूड व्यापाऱ्याचं अपहरण केलं. याबाबत मानपाडा पोलिसांना (Manpada Police) माहिती मिळताच त्यांनी फिल्मी स्टाईलने अवघ्या आठ तासात या व्यापाऱ्याची शहापूर इथून सुखरुप सुटका केली. पोलिसांनी चार अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील एक आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मराज कांबळे आणि रोशन सावंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. आरोपी बेरोजगार असल्याने झटपट पैसे कमवण्याच्या लालसेपोटी अपहरण केल्याची तपासात उघड झालं आहे.
झटपट पैसे कमावण्याच्या लालसेपोटी अपहरण
डोंबिवली पूर्व भागातील स्टार कॉलनी परिसरात मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिम्मत नाहर यांचे डिलक्स प्लायवूड हे दुकान आहे. हिम्मत यांच्याशी कारपेंटर असलेला संजय विश्वकर्मा याची ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत संजयने आपल्या साथीदारासह पैशांच्या लालसेतून हिम्मत यांचे अपहरण करण्याचा प्लॅन आखला. यासाठी त्याने एका ट्रॅव्हल कंपनीकडून शिर्डीसाठी एक गाडी भाड्याने घेतली. 3 ऑगस्ट रोजी संजय विश्वकर्मा त्यांच्या दुकानात गेला. त्याने प्लायवूड संदर्भात काही व्यवहार केले. पैसे एटीएममधून काढून देतो असे सांगत संजयने हिम्मत यांना दुकानाबाहेर काढत गाडीच्या दिशेने घेऊन गेला. गाडीमध्ये संजयचे साथीदार बसून होते. गाडी एटीएमजवळ पोहोचताच त्यांनी हिम्मत यांना पुढच्या एटीएममध्ये जाऊ, असे सांगत गाडी पुढे नेली. काही अंतरावर हिम्मत यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला आणि त्यांचे अपहरण केले.
काही तासातच अपहरणकर्त्यांनी हिम्मत यांचा पुतण्या जितू याला फोन करत हिम्मत सुखरुप हवे असतील तर 50 लाख रुपये द्या अशी मागणी केली. जितूने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. डीसीपी सचिन गुंजाळ, डोंबिवली एसीपी सुनील कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी या आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधिकारी सुनील तारमळे आणि अविनाश वणवे यांची पथके तयार केली.
गावकऱ्यांच्या वेशात पोलीस
तांत्रिक तपास सुरु असताना अपहरणकर्ते दर तासाला जितूला फोन करत ठिकाण बदलत होते. अखेर त्यांनी जितू यांना मुंबई-आग्रा रोडवरील शहापूरजवळ गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांची चार पथके स्थानिक गावकऱ्यांच्या वेशात गोठेघर परिसरात दबा धरुन बसली होती. जितू त्या ठिकाणी पैसे घेऊन गेले. थोड्याच वेळात त्याठिकाणी एक झायलो कार आली. त्यात तीन व्यक्ती होते. जितूने आधी काकांना मला माझ्या ताब्यात द्या असं सांगितलं. त्याचवेळी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या गाडीला घेरत तिघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी हिम्मत यांना गावातील एका खोलीत कोंडून ठेवल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या खोलीत जाऊन हिम्मत यांची सुखरुप सुटका करत त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्या चौथ्या आरोपीला ताब्यात घेतले.
अंधाराचा फायदा घेत एक आरोपी पसार
हिम्मत यांना या खोलीत पलंगाला बांधून ठेवण्यात आलं होतं. यावेळी आणखी एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या प्रकरणी संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मराज कांबळे आणि रोशन सावंत या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून झायलो कार, पाच लाखांची रोकड, चार मोबाईल फोन जप्त केले आहेत. मानपाडा पोलिसांनी अवघ्या आठ तासात पोलिसांनी कारवाई करत व्यापाऱ्याची सुटका केल्याने त्यांच्या कामागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.