Dombivli Crime : रागाच्या भरात कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नाही. बहिणीला छेड (Teasing) काढल्यामुळे संतापलेल्या एका भावाने भलत्याच तरुणाला मारहाण केली. इतकंच नव्हे तर भावाने चाकूने तरुणाच्या हातावर हल्ला देखील केला. परंतु हा तरुण आपल्या बहिणीला छेडणारा नसल्याचं माहित पडताच या हल्लेखोर भावाने तिथून पळ काढला. ही घटना 4 जानेवारीला रात्रीच्या सुमारास डोंबिवलीतील (Dombivli) सागर्ली परिसरात घडली. विठ्ठल भालेकर असं जखमी तरुणाचं नाव आहे. तर पवन पाटील असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.
नेमकी घटना काय?
डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली परिसरात 4 जानेवारीला रात्रीच्या सुमारास एका तरुणीची अज्ञात इसमाने छेड काढली. या तरुणीने ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेला भाऊ पवन पाटील याने सागर्ली परिसरात या तरुणाचा शोध सुरु केला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भालेकर हा तरुण सागर्ली परिसरातून जात होता. याच दरम्यान पवन पाटील याने त्याला गाठले. बहिणीने केलेल्या वर्णनावरुन त्याला संशय आल्याने काहीच विचारपूस न करता त्याने थेट विठ्ठल याला बेदम मारहाण केली. विठ्ठल पवनला का मारहाण करतोयस याबाबत विचारत होता मात्र पवनने काही न ऐकता विठ्ठलला मारहाण सुरुच ठेवली. इतकंच नव्हे तर संतापाच्या भरात पवन पाटीलने आपल्या जवळील चाकू काढून विठ्ठलवर हल्ला केला. या हल्ल्यात विठ्ठलच्या हाताला गंभीर दुखापत झाली. विठ्ठल याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार
पण आपण ज्या तरुणाला मारत आहोत तो छेड काढणारा तरुण नसल्याचं कळताच पवन पाटील चपापला. त्याने तिथून पळ काढला. तरुणाला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच टिळक नगरच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार टिके यांनी विठ्ठल भालेकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी विठ्ठल भालेकरच्या तक्रारीवरुन टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा सुरु करण्यात आली.
मी त्याला किंवा त्याच्या बहिणीला ओळखत नाही : विठ्ठल भालेकर
"मी जेवून घरी येत होतो. मी नाक्यावर आलो असता अचानक एक मुलगा आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. तो मुलगा कोण आहे, याची मला कल्पना नाही. मी त्याला ओळखतही नाही. तू माझ्या बहिणीकडे बघितलं असं तो मला बोलत होता. पण मी त्याला किंवा त्याच्या बहिणालाही ओळखत नाही. त्याचवेळी बहिण बोलली की हा तो नव्हता दुसराच कोणीतरी होता. हे कळल्यावर तो तिथूनच पळून गेला. मी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे," असं विठ्ठल भालेकर या तरुणाने सांगितलं.
हेही वाचा
प्रेमप्रकरणातून वाद, प्रेयसीची हत्या करुन आरोपी पोहोचला पोलिस ठाण्यात; डोंबिवलीतील धक्कादायक घटना