कल्याण : कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळालगत 19 जून रोजी साहिल हाश्मी हा तरुण जखमी अवस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा पोलिसांकडून अंदाज वर्तवण्यात येत होता. जखमी साहिलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला साहिलच्या मोबाईलमुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. पोलिसाच्या तपासात या साहिलबरोबर पळून आलेल्या अल्पवयीन तरुणीच्या चुलत भावाने आणि त्याच्या मित्रांनी साहिलच्या मारहाण करत कोपर ते दिवा दरम्यान चालत्या गाडीतून ढकलून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी महिन्याभराच्या चौकशीअंती 10 जणांना अटक केली असून अन्य एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे .
उत्तर प्रदेशातील भदोई येथे राहणारा साहिल हाश्मी हा तरुण अल्पवयीन प्रेयसीसमवेत 15 जून रोजी पळून गेला होता .18 जून रोजी रत्नागिरी एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाला होता. ही गाडी 19 जून रोजी रात्री 10 वाजता कल्याण स्थानकात पोचली होती. यानंतर रात्री 11 वाजता साहिल लोकलच्या मोटरमनला कोपर आणि दिवा दरम्यान रेल्वे रुळावर पडलेला आढळला . याबाबत डोंबिवली जीआरपीला माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या साहिलचा उपचारादरम्यान पाच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मात्र तोपर्यंत त्याच्याबरोबर पळून आलेली अल्पवयीन तरुणी पुन्हा आपल्या मूळ गावी परत गेली होती. पोलिसांनी साहिल जवळ असलेल्या मोबाईल ताब्यात घेत त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली .त्यानंतर नातवाईकांनी दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागले.
सदर अल्पवयीन तरुणी साहिलबरोबर पळून गेल्याची कुणकुण तिच्या वडिलांना लागली.याबाबत त्यांनी तिच्या अंबरनाथमधील भावाला याची माहिती दिली यानंतर तिच्या भावाने आपल्या गावातील कामानिमित्त मुंबईला असणाऱ्या इतर नातेवाईक आणि मित्रांना बोलावून घेत कल्याण स्थानक गाठले . मेल कल्याणात पोचताच या सर्व आरोपींनी गाडीत प्रवेश करत या दोघांना शोधून काढले आणि साहिलला बेदम मारहाण करून कोपर ते दिवा दरम्यान चालत्या गाडीतून ढकलून दिले होते. झालेली बेदम मारहाण आणि चालत्या गाडीतून पडल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे साहिलचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचे वडील शब्बीर हाश्मी याच्यासह भाऊ कासीम हाश्मी , गुलाम हाश्मी, यांच्यासह 10 जणांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.