Sangli Flood सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला, यावेळी त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. ते म्हणाले की, भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली.
आज सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार यांची पूरग्रस्तांच्या मदत आणि पुर्नवसनाच्या अनुषंगानं आज महत्वाची आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होईल. अजित पवार आणि विजय वडेट्टीवार सांगली, कोल्हापूर भागातील पूरस्थितीचा आणि नुकसानाचा स्थानिक प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत. त्यानंतर राज्यशासनाकडून तातडीनं मदतीबाबतचे निर्देश दिले जातील.
कृष्णेची पातळी 2 फुटांनी ओसरली
सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी ओसरू लागली आहे. दोन फुटांनी पातळी ओसरली आहे. 55 वरून 53 फुटावर गेली आहे. त्यामुळे सांगलीच्या गणपती पेठ, सराफ कट्टा येथील पाणी ओसरत आहे. तर महापालिकेकडून स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत आणि स्वच्छता करण्यात येत आहे.
पुरामुळे सांगली, कुपवाडचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद राहणार, टँकरने पाणीपुरवठा
महापुरात महापालिकेचे पाणी उपसा केंद्र बुडाल्याने सांगली आणि कुपवाड या दोन शहरांना होणारा पाणीपुरवठा पुढचे तीन दिवस ठप्प राहणार आहे. या काळात महापालिकेच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून यासाठी टँकर सुरू आहेत. कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे महापालिकेचे पाणी उपसा केंद्र पुराच्या पाण्यात बुडाले आहे. सध्या नदीची पाणीपातळी जास्त आहे. हे पाणी ओसरल्याशिवाय पाणी उपसा केंद्राजवळ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना जाता येत नसल्यामुळे सांगली आणि कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा बंद झाला आहे. सांगलीत महापालिकेकडून 20 टँकरद्वारे शहराला पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.