ठाणे : जिल्ह्यातील डोंबिवली (dombivali) मोठा गाव परिसरात रिक्षा (Rikshaw) आणि कारमध्ये धडक झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर कारचालकाने 70 वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत दोन लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. या मारहाणीने व अवमानाबद्दल खचून गेलेल्या वयोवृद्ध रिक्षाचालकाने मध्यरात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारचालाने डांबून ठेवलेल्या मुंजाजी यांची मध्यरात्री 3 वाजता सुटका केली, तेव्हापासून ते चिंतेत होते. त्यातूनच, रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी, नातेवाईकांनी पोलिस (Police) ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे.
कारचालकास 2 लाख रुपये द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर डोंबिवलीतील विष्णू-नगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी संतप्तपणे ठिय्या आदोलन सुरू केले आहे. “जोपर्यंत आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी भूमिका नातेवाईकांनी घेत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला आहे. कारचालक हा शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक आहे, त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या, आम्हाला न्याय पाहिजे, एका वृद्ध रिक्षाचालकाबाबत असा धक्कादायक प्रकार घडला हे संतापजनक आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस स्थानकावर रिक्षा चालकांच्या नातेवाईकांची गर्दी जमली आहे. आकाश एकनाथ म्हात्रे असं कार चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विष्णू नगर पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.