Dhule Crime News धुळे : जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी (Shirpur Police) दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये कोट्यावधींचा गुटखा जप्त (Gutkha seized) केला आहे. या गुटख्याची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी (Police) केलेल्या या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांना आज सकाळच्या सुमारास इंदूरकडून धुळ्याकडे राष्ट्रीय महामार्गातील अशोक लेलँड कंपनीच्या पांडुरंगाच्या वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. 


पहिल्या कारवाईत 20 लाखांचा मुद्देमाल जप्त


मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर सापळा रचण्यात आला. संबंधित वाहन आढळल्यावर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यात जवळपास 85 हजार पन्नास रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. वाहनाची किंमत तब्बल वीस लाख रुपये आहे. या कारवाईत 20 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 


दुसऱ्या कारवाईत तीन ट्रकमधून पकडला गुटखा


त्यानंतर गुजरात राज्यातून शहादा रस्त्याने शिरपूरकडे तीन वेगवेगळ्या माल ट्रकमधून  गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला असता एका माल ट्रकमध्ये 1 कोटी 11 लाख 2 हजार 720 रुपये किमतीचा प्लास्टिक गोण्यांमध्ये भरलेला गुटखा आढळून आला आहे. तर दुसऱ्या मार्केटमध्ये, 59 लाख 66 हजार तीनशे रुपये किमतीचा सुगंधित गुटखा आणि तिसऱ्या माल ट्रकमध्ये 62 लाख 45 हजार 944 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला आहे. 


2 कोटी 54 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त


या दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये तब्बल 1 कोटी 64 लाख 14 हजार रुपये किमतीच्या गुटख्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वाहनांची किंमत 90 लाख रुपये इतकी आहे, असा एकूण सुमारे 2 कोटी 54 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी एकाच दिवसात केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 


सांगवी येथे 23 लाखांचा गुटखा जप्त


मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक सांगवी (ता. शिरपूर) पोलिसांनी जप्त केला. महामार्गावरील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर ३१ जानेवारीला रात्री ही कारवाई करण्यात आली. यात 23 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून पोलिसांनी एकास अटक केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या