Dhule Bribe News: एकीकडे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (IG Dattatray Karale) हे धुळे महापालिका निवडणुकीच्या (Dhule Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर सुव्यवस्था आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी धुळे दौऱ्यावर असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यातील पोलीस दलाला नामोहरम करणारी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शिरपूर शहरात थाळनेर पोलीस ठाण्यातील एका हवालदारासह तीन पोलीस कॉन्स्टेबलना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्था, बंदोबस्त आणि संवेदनशील भागांचा आढावा घेण्यासाठी आयजी दत्तात्रय कराळे हे सध्या धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. अशा वेळी पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क आणि शिस्तबद्ध असते. मात्र, याच कालावधीत एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण प्रशासनाच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dhule Bribe News: जुन्या गुन्ह्याचा गैरफायदा घेत लाच मागितल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस) दाखल असलेल्या एका जुन्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक न करण्यासाठी थाळनेर पोलीस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 2 लाख रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे दाखल होताच शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात सापळा रचण्यात आला.
Dhule Bribe News: करवंद नाक्यावर सापळा, एकास अटक
शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करवंद नाक्यावर कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (वय 33, रा. शिरपूर) याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर एसीबीच्या पथकाने कारवाई केली. पथकातील कर्मचारी साध्या वेशात परिसरात तैनात होते. लाच स्वीकारल्याचा इशारा मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पावराला तात्काळ ताब्यात घेतले.
Dhule Bribe News: एसीबीच्या जाळ्यात अडकलेले ‘चौघे’
या कारवाईत खालील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भूषण रामोळे – पोलीस हवालदार
धनराज मालचे – पोलीस कॉन्स्टेबल
किरण सोनवणे – पोलीस कॉन्स्टेबल
मुकेश गिलदार पावरा – पोलीस कॉन्स्टेबल
मात्र, एसीबी पथकाचा सुगावा लागताच दोन संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.
Dhule Bribe News: आयजी जिल्ह्यात असतानाच कारवाई, चर्चांना उधाण
विशेष बाब म्हणजे, आयजी दत्तात्रय कराळे जिल्ह्यात असताना सहसा पोलीस दल अत्यंत शिस्तीत आणि नियंत्रणात असते. अशा परिस्थितीत पोलिसांकडूनच लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे जिल्हाभर उलटसुलट चर्चा सुरू असून, वरिष्ठ स्तरावरून कडक कारवाईचे संकेत दिले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, एसीबीने पुढील तपास वेगाने सुरू केला असून फरार आरोपींचा शोध आणि या प्रकरणातील इतर सहभागाची चौकशी करण्यात येत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा