Dharashiv, Osmanabad News : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई करत अवघ्या आठ तासांत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली आहे. पोलिसांनी हिंगोलीतील चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या या कारवाईचं धाराशिव जिल्ह्यात कौतुक होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरातील एका युवकाचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी फोन करून संबंधित कुटुंबाला चार लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. पीडित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. नळदुर्ग पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या समयसूचकता व मार्गदर्शनाने नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या आठ तासात अगदी फिल्मी स्टाईलने चारही आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील
पोलिसांची धडक कारवाई, आठ तासांत आरोपींना बेड्या -
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नळदुर्ग येथील पाटील तांडा खुदावाडी येथील सुधीर शिवाजी राठोड यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपल्या विहिरीवरील मुरूम रोडच्या कामासाठी पाहिजे, तुम्ही विकाणार आहात का? असे बोलून सुधीर राठोड यांना पाटील तांडा येथील जिजामाता बालकाश्रम येथे बोलावून घेतले . विहिरीवरील मुरूम प्रति हायवा खेप दरही ठरले. आमचे रोडचे साहेब पुढे वागदरी पाटीवर थांबलेत, चला जाऊ उचल द्यायला लावतो, असे सांगितले. सुधीरने स्वतःची मोटरसायकल एका खंडणीखोरास दिली व सुधीर राठोड यास लाल रंगाच्या चारचाकी कारमध्ये बसवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील डोंगराळ घेऊन गेले. खंडणीखोरानी चार लाख रुपयांची मागणी केली. खंडणीखोरांच्या एका मोबाईल वरून सुधिरने पत्नी राजश्री यांनाही माहिती दिली असता पत्नी राजेश्री सुधीर राठोड यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली. फिर्यादीवरून धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस पथकाने अवघ्या 8 तासात सुधीर राठोड यांची सुटका करून हिंगोली जिल्ह्यातून चार आरोपींना बेड्या ठोकल्या.
चार आरोपी कोणते? मुख्य आरोपी अद्याप फरार -
सचिन बापुराव राठोड , अरविंद नागोराव राठोड , विकास शेषेराव राठोड राहणार अंजनवाडा तांडा औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली व अरविंद रुसतुंग चव्हाण राहणार गलांडी तांडा औंढा नागनाथ यांच्या विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज देवकर हे करीत आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी केव्हा गजाड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.