पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये अकरा वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये ही घटना घडली आहे. घटना उघडकीस येताच शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू असताना हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.


नेमकं काय प्रकरण?


या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर परिसरात अकरा वर्षांच्या विद्यार्थ्यावर एका नामांकित शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने हे संतापजनक कृत्य केलं आहे. अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला आहे. त्यामुळे ही घटना समोर आली आहे.


आई-वडिलांना देखील मोठा धक्का


या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार आपल्या आई-वडिलांना देखील सांगितला नाही. या घटनेची माहिती कळताच त्याच्या आई-वडिलांना देखील मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ वारजे पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंगेश साळवे या डान्स टीचरविरोधात गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याला अटक केली आहे.


पोलिसांकडून सध्या आरोपी शिक्षक मंगेश साळवेची चौकशी सुरू आहे. यापूर्वी सुद्धा या शिक्षकाने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशाप्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने शाळेतील शिक्षकांनी, पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.