बीड : जुना व्हिडीओ व्हायरल करुन खोट्या प्रकरणात आपल्याला फसवण्यात आलं, आपल्याला सोडण्यासाठी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Case) तक्रार मागे घेण्याचा प्रस्ताव धनंजय देशमुखांसमोर ठेवण्यात आल्याचा दावा दादासाहेब खिंडकर यांनी केला. दादासाहेब खिंडकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना मोठा दावा केला. 

Continues below advertisement

मस्सागावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर हे 13 महिन्यांच्या कालावधीनंतर कारागृहाबाहेर आले. त्याचं फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ आणि ओवाळणी करत स्वागत करण्यात आलं. एका तरुणाला अमानुष मारहाण झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत खिंडकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर खिंडकर यांना तुरुंगात राहावं लागलं होतं.

दादासाहेब खिंडकर काय म्हणाले? 

दादासाहेब खिंडकर म्हणाले की, "मला फसवण्यात आलेला हा जुना व्हिडीओ आहे. हे सगळे लोक पैसे घेतात, नशा करतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात. सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली, ते प्रकरण दाबण्यासाठी या प्रकरणाचा वापर करण्यात आला. याच लोकांनी गावातल्या अनेक लोकांवर असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच आरोपींनी अनेक लोकांना मारहाण केली, परंतु त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही.

Continues below advertisement

एबीपी माझाशी बोलताना दादासाहेब खिंडकर म्हणाले की, "आपल्यावर जुन्या व्हिडीओच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, आणि तुरुंगात टाकण्यात आलं. आपण तुरुंगात असताना आपल्यावर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी धनंजय देशमुखांना एक प्रस्ताव दिला. दादासाहेब खिंडकरला सोडवायचं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घ्या असा प्रस्ताव धनंजय देशमुखांना देण्यात आला होता."

आपल्यावर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यामागे मोठी राजकीय शक्ती असल्याचा दावा दादासाहेब खिंडकर यांनी केला. तसेच या सर्वांनी गावातील अनेक लोकांना मारहाण केली आहे. त्याचे अनेक व्हिडीओ आपण पोलिसांना दिले आहेत. मात्र, त्या आरोपींवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा दावा दादासाहेब खिंडकर यांनी केला.

दरम्यान, आपण देशमुख कुटुंबासोबत कायम असून हा लढा सुरुच असेल, जीव गेला तरी यातून माघार घेणार नसल्याचं दादासाहेब खिंडकर यांनी सांगितलं. तुरुंगातून बाहेर आल्यावर दादासाहेब खिंडकर यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 1 मार्च रोजी आपला वाढदिवस होता, तुरुंगात असल्यामुळे मित्रांना तो साजरा करता आला नाही. त्यामुळेच मित्रांनी जल्लोषात स्वागत केल्याचं दादासाहेब खिंडकर म्हणाले.

ही बातमी वाचा: