Ashok Kharat Nashik Crime: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, आता या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळाशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची बहीण प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांना शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) अधिकृत नोटीस बजावली आहे. समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.
Ashok Kharat Nashik Crime: काय आहे नोटीसचे मुख्य कारण?
भोंदू अशोक खरात विरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान पोलिसांना 'समता पतसंस्थेत' खरातशी संबंधित अनेक संशयास्पद खाती आढळली आहेत. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे या पतसंस्थेत एकूण 4 खाती आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खात्यांवरून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या आर्थिक व्यवहारांचा खरातच्या सावकारी व्यवसायाशी काय संबंध आहे? हे पैसे कोणाचे आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.
Ashok Kharat Nashik Crime: पाच दिवसांची मुदत; दोन पत्त्यांवर नोटीस रवाना
शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या उपलब्ध असलेल्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर पोस्टाद्वारे ही नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून 5 दिवसांच्या आत त्यांना चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 33 खातेदारांचे जबाब नोंदवले असून, चाकणकर यांचा जबाब या तपासातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
Ashok Kharat Nashik Crime: खरातच्या पोलीस कोठडीत वाढ; तिसऱ्या गुन्ह्यात ताबा
दुसरीकडे, नाशिकमध्ये एसआयटीने (SIT) अशोक खरातला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी आता तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, प्रसूती सुलभ व्हावी आणि मुलगा व्हावा, असे आमिष दाखवून एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
Ashok Kharat Nashik Crime: चौकशीतून नेमके काय निष्पन्न होणार?
अशोक खरातने पतसंस्थांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केल्याचा संशय बळावला आहे. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेली 100 खाती आहेत. तर जगदंब पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली 32 खाती आहेत. रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच खरातशी जवळीक असल्याच्या आरोपावरून आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. आता त्यांच्या बहिणीची चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाची राजकीय आणि गुन्हेगारी व्याप्ती किती मोठी आहे, हे स्पष्ट होत आहे. या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
