रायगड : जिल्ह्यातल्या खोपोली शहरातील पटेलनगर भागात एका महिलेने चक्क पतीलाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्शद अली अस खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून अर्शद हा आपल्या पत्नी व मुलीसह गेल्या अनेक वर्षांपासून खोपोलीत (Khopoli) राहत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अर्शद आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबात वाद होत होता. अर्शदचे बाहेर अनैतिक सबंध असल्याचे त्याच्या पत्नीला समजले. पतीच्या अनैतिक संबंधाच्या वादावरुनही दोघांमध्ये खटके उडत होते. त्याच रागातून पत्नीने पतीला जीवे मारल्याची (Crime News) घटना घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) आरोपी पत्नीला अटक केली आहे. दुसरीकडे अंबरनाथमध्ये एका 25 वर्षीय युवकाची मध्यरात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पतीच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरुनच तिने रात्री नवरा झोपेत असतानाच दगडाने ठेचून पतीचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. तर, गुन्हा व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या शोधकार्यात श्वानाचा वापर करण्यात आला. त्यानंतर, पतीचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेला दगड श्वानाने शोधून दिला. जेव्हा संशयास्पद दगड श्वानाच्याजवळ नेऊन हुंगण्यास आला, त्यानंतर अर्शदची पत्नीच खूनी असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले होते. आरोपी पत्नीने पोलीस ठाण्यात कबुली दिली असून पुढील अधिक तपास सुरू आहे.
अंबरनाथमध्ये 25 वर्षीय युवकाची हत्या
अंबरनाथच्या ऑडनस फॅक्टरी येथील अंबर चौकात एका 25 वर्ष तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. सचिन भोसले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो अंबरनाथमधील जावसई गाव परिसरातील रहिवाशी आहे. रात्रीच्या सुमारास अंबर चौकात गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सचिनचे मारेकरी कोण, अंबर चौकात तो कोणासोबत आला होता, त्याची कोणासोबत दुश्मनी होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आला असून घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं