Crime News: तरुण पिढीकडून सध्या मोबाईल आणि त्याद्वारे सोशल मीडियाचा सर्रास वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांकडूनही ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी त्याचा जसा वापर केला जातो त्याच्यापेक्षा जास्त सोशल मीडियावरील आभासी जगात वावरण्यासाठी ही केला जातो. यातून एकमेकांची टिंगलटवाळी करण्यापासून शिवीगाळ करण्यापर्यंतही काहींची मजल जाते. चार महिन्यांपूर्वी केलेली शिवीगाळ एका विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतली असती. शिविगाळ केल्याचा राग मनात ठेवून बेदम मारहाण करण्यात आली. 


लातूरमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे. लातूर शहरातील सीताराम नगर भागात  बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास पळवून नेऊन जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. चार महिन्यांपूर्वी या विद्यार्थ्याने इंस्टाग्राम वर एकास शिवीगाळ केली होती याच गोष्टीचा राग मनात धरून सदर विद्यार्थ्यास आठ जणांनी कार मध्ये जबरदस्ती बसवून पळवून नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ही घटना 12 जून रोजी घडली. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारावीत शिकणारा हा विद्यार्थी शिकवणी वरून मित्रासह दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळेस आकाश जाधव आणि योगेश शेंडगे यांनी त्याला अडवले आणि सायकलवरून खाली ओढत  मारहाण करण्याला सुरुवात केली. त्याच वेळी पांढऱ्या रंगाची एक कार तिथे आली. कारमध्ये विद्यार्थ्याला जबरदस्ती बसवण्यात आलं आणि वासनगाव शिवारामध्ये नेण्यात आलं. कारमध्ये काहीजण होते, त्याशिवाय काहीजण दुचाकीवरून वासनगाव शिवारात दाखल झाले. या दरम्यान, दिनेश शेंडगे आणि आकाश जाधव यांनी पीडित विद्यार्थ्यांला काठी आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 


गणेश शेंडगे याला चार महिन्यापूर्वी या पीडित विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर शिवीगाळ केली होती. याच बाबीचा राग मनात धरत त्याला आठ लोकांनी जबर मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी सोडून देण्यात आले. मारहाणाीनंतर पीडित विद्यार्थ्याने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत पुढील तपासाच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.