Crime News: घरावर पेट्रोल फवारून पेटवल्याने झोपेत असलेल्या आई आणि मुलीचा आगीत जळून अंत झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात बेळगली येथे मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.
या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.
मध्यरात्री अज्ञातांनी पेट्रोलनी पेटवले घर
कर्नाटकातील बेळगली येथील अक्कीमरडी येथे शेतात एका पत्राच्या शेडमध्ये दस्तगीर साब मौलासाब पेंढारी कुटुंब राहते. या कुटुंबाच्या घरास मध्यरात्री अज्ञातांनी विद्युत मोटारीच्या सहाय्याने पेट्रोल शिंपडत आग लावली.
या आगीत झोपेत असलेल्या मायलेकींचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञातांनी घर का पेटवले, याविषयी अद्याप कोणतेही माहिती समोर आली नसून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण केले होते.
कुटुंबातील लोक बाहेर येऊ नये म्हणून घराला बाहेरून कडी
अज्ञातांनी घराला आग लावून कुटुंबातील लोक बाहेर येऊ नये यासाठी बाहेरून कडी लावली होती. पेट्रोलचा वास आल्यावर सुभान पेंढारी यांना जाग आली. त्यांनी आजोबा दस्तगीर यांनाही उठवले परंतु दरवाजाला बाहेरून कडे असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. अखेर दरवाजाची फळी तोडून ते दोघे बाहेर पडले. मात्र, झोपेत असलेल्या आईला उठवण्यासाठी मुलगी शबाना गेली , पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे आई मुलीचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
जखमींवर उपचार सुरु, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ५ पथके रवाना
आगीत भाजलेले सुभान पेंढार यांनी दस्तगीर पेंढारे यांच्यावर महालिंगपूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यानंतर उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार विकास यांनी घटनास्थळी दाखल होत गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. घटनास्थळी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला देखील पाचरण करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पाच पथके स्थापन करून विविध ठिकाणी रवाना केली आहेत.
हेही वाचा: